नवी मुंबई: कोपरखैरणेत एका युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात घडला होता. मात्र तिच्या परिचित युवकाने दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केली असा दावा तिच्या पालकांनी केला होता. याबाबत काही ठोस पुरावे सादर करूनही त्या युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता अखेर आयुक्तांच्या पर्यंत प्रकरण गेल्यावर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यश जाधव आणि हर्ष जाधव असे यातील आरोपींची नावे आहेत. कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करणारी युवती आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचित होते. त्यातून आरोपीचे एकतर्फी युवतीवर प्रेम होते. मात्र युवती शिक्षणाला महत्व देत शिकत होती. दरम्यान त्या युवकाने तिला मानसिक त्रास देणे सुरु केले.  त्यात इन्स्टाग्रामवर शारीरिक सुखाची मागणी यश जाधव याने केली . तसेच युवतीच्या आई विषयी अश्लील भाषेत संदेश टाकला. या मानसिक धक्यातून ती सावरत नाही तोच तिच्या घराजवळ राहणाऱ्या हर्ष जाधव याने तिच्याशी भांडण उकरून काढले. या सर्व प्रकरणाने वैतागून सदर युवतीने ३० नोव्हेंबरच्या रात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. 

हेही वाचा : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना विविध पोलीस ठाण्यात दाखल

तिचे वडील हे मुंबईतच कामाच्या ठिकाणी राहत होते तर आई आजारी म्हणून गावी सांगली येथे राहत होती. हि बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. युवतीचा मृतदेह घेऊन ते गावी गेले व अंत्यसंस्कार करून  काही दिवसांनी पुन्हा नवी मुंबईत आले. या धक्यातून सावरत असताना तिच्या मोबाईल मध्ये आरोपींनी केलेला प्रकार व आसालाच्या लोकांच्या सांगण्यातून झालेले भांडण यांबाबत त्यांना कळले. याबाबत पोलिसांना माहिती पालकांनी दिली. त्यानंतर हालचाल करीत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.