नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथील ऑर्केस्ट्रा बार सुरु ठेवायचा असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक पत्रकार असून दुसरी त्याची महिला साथीदार आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत दोन्ही आरोपींना अटक केले आहे. हेही वाचा : नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द संदीप रासकर आणि सोनाली दुनघव असे यातील अटक आरोपींचे नाव आहे. एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत हेवन सिक्स व एमएच ४३ नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी दोन्ही आरोपी आले होते. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधत तुमचा बार बाबत पोलीस ठाण्यात तक्रार न करण्यासाठी तसेच बार चालवायचा असेल तर दोन लाखांची खंडणीची मागणी केली. हि मागणी मान्य न झाल्यास पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देत हजारोंच्या संख्येने बार वर महिलांचा मोर्चा आणून बार वर हल्ला करत बार उध्वस्त केला जाईल असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून तक्रार केली जाईल अशी धमकीही देण्यात आली.त्यामुळे हॉटेल प्रशासनाने तडजोड करीत २ ऐवजी एक लाखांची खंडणी देण्याचे ठरले या पैकी २५ हजार रुपये बळजबरीने घेत तेथून निघून गेले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली . या तक्रारीची शहानिशा करीत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि तात्काळ हालचाल करीत पुणे येथील रहिवासी असलेला कथित पत्रकार संदीप याला अटक केले. त्याने घेतलेले २५ पैकी १८ हजार जप्त करण्यात आले आहेत.