नवी मुंबई : अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यात तो कर्मचारी जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पाम बीच येथील चाणक्य सिग्नलजवळ घडली. अप्पासाहेब पाटील आणि नितीन पाबळे हे वाहतूक पोलीस शिपाई नेहमीप्रमाणे पामबीच येथे गस्त घालत होते. त्यावेळी वाशीच्या दिशेने जात असताना त्यांना टी. एस. चाणक्य सिग्नलपासून काही अंतरावर दोन इसम रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली , आणि रस्त्यावर पडलेल्या दोघांना उचलून रस्त्याच्या बाजूला करत चौकशी केली असता त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाल्याची माहिती अपघातग्रस्तांनी पोलिसांना दिली. त्यांच्या मदतीसाठी फोन करत असताना सीबीडी ते वाशीच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने ( एमएच ४३ बीयु २२०३) एका सुमो गाडीला जोरदार धडक दिली आणि लगेच काही अंतरावर उभ्या असलेल्या गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीला धडक दिली. हेही वाचा : मोरबे धरण १०० टक्के भरले! धरणातून १९.०८७ क्युबीक मीटर पाण्याचा विसर्ग, जलचिंता मिटली पण १० टक्के पाणीकपात सुरुच राहणार दुर्दैवाने या गाडी जवळ पोलीस शिपाई नितीन पाबळे उभे होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे अपघातास कारण ठरलेला कार चालक गाडी न थांबवता मदत न करता पळून गेला. याबाबत आज (रविवारी) सकाळी नेरुळ पोलीस ठाण्यात सार्थक जयंतीलाल मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.