नवी मुंबई : चिपळूण ते मुंबईला जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात शीव पनवेल मार्गांवर सानपाडा येथे झाला आहे. बस चालकाला अंदाज न आल्याने बस थेट दुभाजकावर चढावली आहे. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेले नाही.
आज (बुधवारी) चिपळूण ते मुंबई या शिवशाही बसचा (एम एच ९ एफ एल १०८२) शीव पनवेल महामार्गावर सानपाडा येथे अपघात झाला. बस चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्याने बस थेट दुभाजकावर गेली. हा अपघात सकाळी सात सव्वासातच्या सुमारास घडला. बस मध्ये सुमारे २० प्रवासी होते. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. राज्य परिवहन मंडळाने प्रवाश्यांसाठी दुसऱ्या बसची सोय करून देत प्रवाशांना मार्गस्त केले. या घटनेबाबत माहिती मिळताच तुर्भे वाहतूकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी पोलीस पथक पाठवून अगोदर वाहतूक सुरळीत केली. सकाळची वेळ असल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या व्यतिरिक्त फारशी वर्दळ नव्हती.
या मार्गावरून धावणाऱ्या गाडीतील लोक अपघातग्रस्त बस बघत बघत पुढे जात असल्याने वाहतूक विनाकारण मंदावली होती. परिणामतः बघ्यांच्या गर्दीने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ या बघ्यांना हुस्कावाल्याने वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत क्रेन मागवण्यात आल्याने सव्वा आठ पर्यंत बस रस्त्याच्या कडेला लावण्यात यश आले. अशी माहिती तुर्भे वाहतूकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.
याच ठिकाणी असे अनेक छोटे अपघात होत असतात. त्यामुळे जिथे दुभाजक सुरु होतो त्या ठिकाणी रेडियम वा अन्य दुभाजन सुरु होत असल्याचे वाहन चालकांच्या सहज लक्षात येईल अशी खूण करणे आवश्यक आहे. वाहन चालवताना दुभाजक सुरु झाला हे त्यामुळे लक्षात येऊन अपघात टाळता येतील अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली.