नवी मुंबई : स्वच्छतेचा मंत्र आपल्या कृतीतून पटवून देणाऱ्या व कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व मनामनात रुजविणाऱ्या संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या माध्यमातून ड्राय वेस्ट बँक या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता विषयक उपक्रम राबविताना नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नाविन्यपूर्णता आणण्यावर भर दिला आहे. यामध्ये शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या ड्राय वेस्ट बँक या अभिनव उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होऊन कचरा कमी करण्याचे संस्कार विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच होताना दिसत आहेत.

हेही वाचा…नवी मुंबई आणखी चकचकीत होणार, स्थापनेच्या ३३ वर्षांनंतर पहिला प्रारूप विकास आराखडा शासनाला सादर

ड्राय वेस्ट बँक या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी आपल्या घरातून टेट्रापॅक, बॉटल, चॉकलेट व गोळ्यांचे रॅपर, सॅशे इत्यादी कचरा सुक्या कचऱ्यात न टाकता शाळेत घेऊन येतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात त्यांना पॉईंट्स देण्यात येतात व सर्वाधिक पॉईंट्स जमविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस स्वरूपात शालेय साहित्य प्रदान करून सन्मानित केले जाते. याकरिता शिक्षकांकडे उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छता पासबुक देण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थ्याने जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या तुलनेत पॉईंट्सची नोंद केली जाते.

सद्यास्थितीत बेलापूर, नेरुळ, वाशी या तीन विभागातील १५ शाळांमध्ये राबविला जाणारा हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा…पनवेल : सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल

सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये झालेल्या ड्राय वेस्ट बँक उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उत्तम कामगिरी करुन पारितोषिकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत या उपक्रमातील आपले चांगले काम इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.