पनवेल : पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाशेजारी निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम रखडले असताना रायगड जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांनी या रखडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी भव्य कॅथलॅब सेंटर उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्याने उभारण्यात येणाऱ्या कॅथलॅब सेंटरमध्ये एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी अशा शस्त्रक्रीया मोफत केल्या जाणार आहेत. यासाठी ९ कोटी रुपयांचा खर्च आरोग्य विभागातर्फे केला जाणार आहे. जिल्ह्यातील हे पहिले कॅथलॅब सेंटर असणार आहे.

हेही वाचा…नवी मुंबईतील भाजयुमो कार्यकारिणीत घराणेशाही

पनवेल शहरातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधकाम करून हे रुग्णालय सुरू करण्यासाठी तेरा वर्षे लागली. ज्या वेळेस रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव आला. त्याच वेळी डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी रुग्णालय इमारतीला खेटून पाच हजार चौरस मीटरच्या भूखंडावर निवासस्थानाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

मात्र रुग्णालयाचे काम रखडल्याने निवासस्थान बांधकामाचा निधी त्या वेळचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय बांधकामासाठी वापरल्याने निवासस्थानाचे बांधकाम रखडले. जिल्ह्यातील रखडलेले आरोग्य विभागाचे प्रकल्प तातडीने शासनाकडे पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेणे ही जबाबदारी रायगड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांची असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या निवासस्थानापेक्षा पनवेल तालुक्याला भव्य सरकारी प्रयोगशाळा तातडीने त्याच जागेवर बांधण्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरू केला. सध्या अपूर्णावस्थेत निवासस्थानाची इमारत भग्नावस्थेमध्ये दिसत आहे. हे निवासस्थान बांधण्यासाठी लाखो रुपये शासनाने खर्च केला आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : महापालिका शिक्षकांवर सर्वेक्षण कामांचा भार!

सरकारी डॉक्टरांना निवासाची आवश्यकता

● करोना साथरोगकाळात जिल्ह्यातील पहिले करोना रुग्णालय म्हणून पनवेलचे नानासाहेब धर्माधिकारी हे रुग्णालय घोषित केल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांचा हे रुग्णालय आधार बनले.

● शेकडो जणांचे प्राण याच रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी खडतर परिश्रम घेऊन वाचविले. मात्र आरोग्यसेवकांची कामाची वेळ पूर्ण झाल्यावर त्यांनी झोपावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला.

● आरोग्यसेवकांना रुग्णालयाशेजारी निवासस्थान का असावे याची आवश्यकता त्या वेळेस अनेकांना समजली.

● महाराष्ट्र शासनाच्या नियम व आराखड्यानुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालय व निवासाची जागा आरोग्य विभागाला मिळाली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel district hospital campus may construct cath lab center instead of doctor s resident psg
First published on: 24-01-2024 at 13:46 IST