पनवेल : भारतीय हवाई दलाच्या शेवा गावाजवळील विमान विरोधी क्षेपणास्त्र केंद्रातील (अ‍ॅण्टी एअरक्राफ्ट मिशाईल स्टेशन) प्रतिबंधित परिसरातील तांत्रिक क्षेत्रात संशयितपणे फिरणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पहाटे न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. संशयित व्यक्तीचे २० वर्षे वय असून त्याचे नाव तोरिकुल नूहू शेख असे आहे.

तोरीकुल हा नवी मुंबईतील इंदीरानगर झोपडपट्टीत राहण्यास होता. तोरीकुल हा मुळ राहणारा झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील आहे. रविवारी चौकशीनंतर तोरीकुल याला अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तोरीकुल याची २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचा…उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख

उरण शेवा येथील भारतीय हवाई दलाच्या कनिष्ठ वॉरंट अधिकारी अमित वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तोरीकुल हा क्षेपणास्त्र केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात कर्तव्यावर नेमला नसताना सुद्धा त्या परिसरात कोणाच्या सांगण्यावरुन गेला. तो नेमका काय करत होता. तसेच तो यापूर्वी या ठिकाणी किती वेळा आला. त्याने या परिसरातील माहिती इतर कोणाला दिली का याविषयीचे अनेक प्रश्न तपास यंत्रणेला पडले आहेत. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कोते यांनी या गंभीर प्रकरणी तोरीकुल याच्याविरोधात शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) (अ) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. स्थानिक पोलिसांसोबत नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक सुद्धा तोरिकुलची चौकशी करत आहेत.