नवी मुंबई – महाराष्ट्रात एकीकडे मराठी संस्कृती तसेच मराठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यशासन सातत्याने मराठीचा आग्रह धरत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी अनेक मराठी संस्था, राज्यकर्ते आंदोलने करताना पाहायला मिळत असताना नवी मुंबई महापालिकेत मात्र इंग्रजी वाचन वृद्धीच्या नावाखाली कोटींचा खर्च केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या प्रति दररोज ८ वी ९ वीच्या महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. तर १० वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विकेन्डर साप्ताहीकाचे वाटप करून कोटींचा खर्च केला जात असल्याने खरच त्यामुळे वाचनसंस्कृती वाढते का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याच्या हट्टापायी हा उपक्रम सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – सीबीएसई शाळेत विद्यार्थी १३०० शिक्षक फक्त पाच, नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळेचा नुसताच डंका

नवी मुंबई महापालिकेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांपर्यंत असून त्यातील ८ वी व ९ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना मागील काही वर्षांपासून एका इंग्रजी दैनिकाचे वाटप केले जाते, तर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा विकेन्डर साप्ताहीक वाचनासाठी दिले जाते. परंतु, प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनासाठी हे दैनिक व साप्ताहीक देण्याऐवजी शाळेत वाचनालयासाठी हेच दैनिक शाळेच्या वऱ्हांड्यात उपलब्ध करून दिल्यास व्यर्थ जाणारा कोटींचा खर्च वाचेल असे मत पालिका अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या शाळेत दैनिक वाटप होणाऱ्या वर्तमानपत्राचे अनेक वेळा विद्यार्थी उपस्थिती नसल्यामुळे तसेच त्याचे वाटपच न केल्यामुळे गठ्ठेच्या गठ्ठे पडून राहत असल्याची व ते शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच रद्दीला दिले जात असल्याबाबतची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दैनिक साप्ताहीक विकेन्डर वाटप महापालिकाक्षेत्रातील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कितपत उपयुक्त आहे, असा स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या नावाखाली उलटसुलट चर्चा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – नवी मुंबई: आर्किटेकचे पदवीत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी निघाला ड्रग्ज विक्रेता

नवे शैक्षणिक वर्ष हे काही दिवसांत सुरू होणार असल्याने पालिकास्तरावर इंग्रजी दैनिक वृत्तपत्र वाटपाबाबतच्या व साप्ताहीक वाटपाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत विविध उपक्रम राबवले जातात, परंतु त्याची अत्यावश्यकता व अंमलबजावणी यांच्याबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत असतात. नवी मुंबई महपालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना राज्यशासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जात असून दुसरीकडे यंदा गणवेशाचेही वाटप १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केले जाणार असून, दुसरीकडे इंग्रजी वाचनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कोटींच्या खर्चाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिका शाळांमधील ८ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप होणाऱ्या वर्तमानपत्राबाबत व साप्ताहिकाबाबत अहवाल देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी दिली.

महापालिकेच्या ८ वी ते १० वीच्या विद्यार्थांना इंग्रजी वर्तमानपत्र व साप्ताहीक वाटपासाठीचा खर्च

८ वी ९ वीच्या पालिकेच्या विद्यार्थ्यांना दैनिक इंग्रजी वर्तमानपत्र वाटपासाठी होणारा वार्षिक खर्च – ३४,८९,६००

१० वीच्या पालिकेच्या विद्यार्थ्यांना विकेन्डर हे साप्ताहीक वाचनासाठी होणारा वार्षिक खर्च – २२,४३,२५२

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचनवृद्धीसाठी इंग्रजी दैनिक तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विकेन्डरबाबत अहवाल शिक्षण विभागाकडून मागवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. – संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the name of increasing english reading did navi mumbai mnc spent lot of money ssb
First published on: 03-06-2023 at 13:45 IST