नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत कोविड काळापासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत खर्चात वाढ तर महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेवीची रक्कम १७५० कोटींवर आली आहे. याच काळात एकूण खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच ठेवी कमी झाल्या असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेत करोनाकाळापासून लोकप्रतिनिधी नसून पालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे करोनाच्या काळापासून आतापर्यंत प्रशासनाने हवी तशी कामे काढल्यानेच खर्चात वाढ होऊन ठेवींमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. पालिकेच्या ठेवी कमी झाल्याची माहिती ही सुधीर दाणी यांना माहिती अधिकारातून सजग नागरिक मंचच्या माध्यमातून पालिकेकडूनच प्राप्त झाली आहे.
आर्थिक वर्ष २०१९ -२० मध्ये २,२३७ कोटी रुपयांची ठेव होती ती आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १,७५० कोटी रुपयांपर्यंत घसरलेली आहे. करोनाकाळात बहुतांश नागरी कामे बंद असून देखील प्रशासकीय राजवटीत पालिकेच्या ठेवीं मात्र कमी झाल्याचे दिसत आहे.
चौकट- पालिकेच्या ठेवी
२०१९-२० – २२३७ कोटी
२०२०-२१ – २०७२ कोटी
२०२१-२२- १५६३ कोटी
२०२२-२३- १३०९ कोटी
२०२३-२४- १५०० कोटी
२०२४-२५- १७५० कोटी
नवी मुंबई महापालिकेच्या गेल्या ५ वर्षांच्या पाहता मागील ३ वर्षांपासून ठेवींमध्ये वाढ झालेली आहे. दरवर्षी पालिकेच्या ठेवींमध्ये २०० कोटींपेक्षा अधिकची वाढ होत आहे. पालिकेने खर्चावर नियंत्रण आणल्यामुळेच ठेवींमध्ये वाढ झाली आहे. – सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, नवी मुंबई महापालिका