नवी मुंबई : देशातील सर्वाधिक व्यस्त समजल्या जाणाऱ्या शीव पनवेल मार्गावर रोजच्या अपघातात वाढ होत आहे. या घटनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाणही वाढले असून हा प्रकार सार्वधिक तुर्भे परिसरात होतो. या परिसरात रात्रंदिवस टोईंग व्हॅन कार्यरत ठेवाव्या लागतात. याचा सर्वाधिक ताण वाहतूक पोलिसांवर पडत असून सार्वजनिक बांधकाम विभाग निदान पावसाळ्यापूर्वी हे पट्टे मारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शीव पनवेल हा देशातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक समजला जातो. राजधानी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग असून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. शीव पासून सुरु होणारा हा मार्ग कळंबोली सर्कल येथे संपतो. २५ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर येणाऱ्या पाच आणि जाणाऱ्या पाच अशा मिळून दहा मार्गिका आहेत. काही उड्डाणपूल वगळता जवळपास सर्व रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेले आहे. त्यामुळे सुसाट मार्ग म्हणून त्याची ओळख होती.
हेही वाचा >>> नवी मुंबई: महापालिका शाळांतील ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिला जलबचतीचा संदेश
हा महामार्ग असला तरी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महानगर पालिका हद्दीतून तो जात असल्याने या तीन महानगर पालिका शहरातील वाहन चालकही या मार्गाचा वापर करतात, त्यात गेल्या पावसाळ्यापासून या रस्त्यावरील मार्गिका पट्टे पुसट होऊन आता पूर्णपणे नष्ट झालेले आहेत, पाच मार्गिकेच्या भल्या मोठ्या रस्त्यावर खाजगी छोट्या गाड्यांची संख्या जास्त असल्याने ते चालक व्यावसायिक चालका प्रमाणे सराईत नसतात, त्यामुळे मार्गिका पट्टे अभावी अचानक या गाड्या मार्गिका सोडून अन्यत्र कधी जातात हे वाहन चालकांच्याही लक्षात येत नाही, परिमाणी मागून येणारे वाहनांची ठोस त्याला बसते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एल अॅण्ड टी कंपनीचे सीवूड्स येथील पदपथाचे काम पुन्हा सुरू
गाड्या थांबणे, वाहन चालकांची होणारी बाचाबाची या कारणांनी एकाच वेळेस किमान दोन मार्गिकेची वाहतूक ठप्प होते. त्यात शेजारील मार्गिकेवरून जाणारी वाहने काय झाले बघण्यासाठी वाहने अत्यंत धीम्या गतीने हाकतात त्यामुळे तेथेही वाहन कोंडी होते. हा प्रकार सर्वाधिक तुर्भे भागात होत असून रोज किमान एक तरी छोटा अपघात होत आहे.