१४ हजार २८३ जणांचे लसीकरण

नवी मुंबई :  शहरात आतापर्यंत १४  हजारांहून अधिक आरोग्यसेवकांना लस देण्यात आली असून यापुढे लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली असून आता २५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. या केंद्रांचा विस्तार पन्नासपर्यंत करण्याची तयारी पालिकेची आहे.

शहरात १६ जानेवारीपासून चार केंद्रांवर दररोज ४०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. त्यानंतर एका केंद्रांची वाढ करीत दररोज एक हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर सहा केंद्रांची वाढ करीत आता १४ केंद्रांवर दरदिवशी १४०० आरोग्यसेवकांना लस दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार २८३ जणांचे लसीकरण केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रात वाढ करण्यात आली असून आता २५ केंद्रावर लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी पोलीस,जवान, पालिका कर्मचारी, सफाईकामगार, शिक्षक अशा सर्वांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी ८ केंद्र सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.

८४ नवे करोनाबाधित

नवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी ८४  नवे करोनाबाधित आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५३,६५२  इतकी झाली असून मृतांचा आकडा १०९७   इतका झाला आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९७ टक्के असून एकूण ५१,७३० जण करोनामुक्त झाले आहेत.  उपचाराधिन रुग्ण ८२५ आहेत.