बलात्कार, विनयभंगाच्या घटना चिंताजनक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : शहरात महिला अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.  बलात्काराच्या घटना गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट घडल्या असून विनयभंग प्रकरणातही वाढ झाली आहे. महिला आता तक्रार करण्यास पुढे येत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

नवी मुंबईत व्हाइट कॉलर आणि सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याची चर्चा नेहमीच असते. मात्र शंभर टक्के शिक्षित शहरात महिला अत्याचारांत झालेली वाढ ही शोभनीय नाही. २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कालावधीत ९६ बलात्काराचे गुन्हे नोंद झाले होते. तर २०२१ मध्ये जानेवारी ते ओक्टोबर या केवळ दहा महिन्यांत १६७ बलात्कारांच्या घटना घडल्या आहेत. सरासरी काढली तर महिन्याला सुमारे १५ बलात्काराच्या घटना शहरात घडत आहेत.

याशिवाय विनयभंग प्रकरणांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. २०२० या वर्षात १५५ विनयभंगाचे गुन्हे नोंद होते. आता २०२१ या वर्षात केवळ दहा महिन्यांत १६० गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तर २०२० मध्ये १४४ आणि २०२१ मध्ये १५६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.

परिचित व्यक्तीकडूनच कृत्य

बलात्कार गुन्ह्यांत बहुतांश घटना या परिचित व्यक्ती वा नातेवाईकांकडूनच घडल्या आहेत. शहरात वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटनाही घडली आहे. त्यामुळे महिलांनी अधिक सक्षम व सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

गुन्हे वाढले याचे कारण अत्याचारांविरोधात महिला पुढे येत आहेत. महिला कुठेच सुरक्षित नसून बलात्कार करणारे अनेकदा नातेवाईक असतात. यासाठी महिलांनी स्वत: सक्षम होणे गरजेचे आहे. नवी मुंबईसारख्या शिक्षित शहरात या घटनांत वाढ होणे लाजिरवाणी बाब आहे. -अमरजा चव्हाण, सामाजिक कार्यकत्र्या

महिला अत्याचारांबाबत पोलीस नेहमीच तत्काळ कारवाई करतात. जवळपास सर्वच गुन्हे उकल करण्यात यश आलेले आहे. अलीकडे महिलांमध्ये जागृती होत असल्याचे दसत असून महिला स्वत: होऊन धाडस करीत पोलीस ठाण्यात येत आहेत. -सुरेश मेंगडे, उपायुक्त, गुन्हे शाखा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in violence against women incidents of rape molestation are worrisome akp
First published on: 27-10-2021 at 00:25 IST