नवी मुंबई : मुंबईपेक्षा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये यंदा फ्लेमिंगोंची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ठाणे खाडीकिनारी २५ हजार फ्लेमिंगो दिसून आले होते, तर हीच संख्या मार्च महिन्यात ५४ हजार होती.
नोव्हेंबर ते मे या कालावधी गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या या फ्लेमिगोंची संख्या दरवर्षी वाढत असून नवी मुंबई पालिकेने शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शहरात फ्लेमिंगो महोत्सवदेखील आयोजित केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील फ्लेमिंगो पक्ष्यांचे पाहणी बीएनएचएसच्या वतीने दरवर्षी केली जाते. या पाहणीत २०१८ पेक्षा यंदा फ्लेमिंगोंची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. न्हावा शेवा शिवडी सागरी मार्गाचे काम जोरात सुरू असल्याने ठाणे खाडीकिनारी हे विलोभनीय पक्ष्यांची संख्या जास्त दिसून येऊ लागली आहे. ‘बीएनएचएस’ने डिसेंबर २०२१ मध्ये या पक्षी गणनेला सुरुवात केली होती. डिसेंबरमध्ये ही संख्या २५ हजार होती, तर मार्चमध्ये ती ५४ हजारांवर गेली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने १९९४ मध्ये केलेल्या पहिल्या पक्षी गणणेत शिवडी परिसरात या काळात ८ हजार फ्लेमिंगो आढळून आले होते. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये डिसेंबर ते मार्चमध्ये ६५ हजार फ्लेमिंगोंची गणना झाली असून शिवडी येथे २५ हजार तर न्हावा शेवा येथे ९ हजार ग्रेटर फ्लेमिंगो आढळून आलेले आहेत. जगात सहा प्रकारचे फ्लेमिंगो आढळून येतात, त्यातील दोन प्रजाती या भारताच्या खाडीकिनाऱ्यावर दिसून आलेल्या असल्याचे या पाहणीत म्हटले आहे.
आज फ्लेमिंगो महोत्सव
आज फ्लेमिंगो महोत्सव शहरातील पाणथळे आणि स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे या प्रमुख समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी एकत्र आले असून त्यांनी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी फ्लेमिंगो महोत्सवाचे आयोजन केले आहे. नेरुळ सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक शाळेच्या प्रवेशद्वार क्रमांक पाच येथील सभागृहात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ दरम्यान पक्षी निरीक्षणाची संधी पक्षीप्रेमींना मिळणार आहे. महोत्सव सर्वासाठी मोफत असणार आहे.