scorecardresearch

उरणमधील जैविक कचऱ्यात वाढ; दररोज दवाखाने, प्रयोगशाळा, रुग्णालयांतून सुमारे २४० किलो जैविक कचरा

उरण तालुक्यातील शहर, ग्रामीण भागात असलेल्या दवाखाना, रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्या संख्येमुळे यामध्ये दररोज जमा होणारा सुमारे २५० किलो जैविक कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) विल्हेवाट लावण्याचे काम दिवसेंदिवस खर्चिक होऊ लागले आहे.

उरण : उरण तालुक्यातील शहर, ग्रामीण भागात असलेल्या दवाखाना, रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्या संख्येमुळे यामध्ये दररोज जमा होणारा सुमारे २५० किलो जैविक कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) विल्हेवाट लावण्याचे काम दिवसेंदिवस खर्चिक होऊ लागले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उरण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात सुमारे १०० हून अधिक खासगी दवाखाने, १५ हॉस्पिटल, ६ लॅबोरेटरी कार्यरत आहेत. यामध्ये ३० खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, कोप्रोली येथील शासकीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

दररोज रुग्णालयात करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सामुग्री यामुळे उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दररोज ७-८ किलो तर कोप्रोली आरोग्य केंद्रात २-३ किलो जैव वैद्यकीय कचरा जमा होतो. तर शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र वगळता तालुक्यात शहर व ग्रामीण भागात १०० हून अधिक दवाखाने, १५ हॉस्पिटल, ६ लॅबोरेटरी  कार्यरत आहेत. यामध्येही दररोज २२५ ते २४० किलो ‘बायो वेस्ट’ जमा होतो. त्यामुळे दररोज शहर व ग्रामीण भागातील दवाखाने, हॉस्पिटल, प्रयोगशाळा मिळून २५० किलो जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे सर्वासाठी अत्यंत जिकिरीचे काम पार पाडावे लागते.  

दररोज जमा होणारा जैविक कचरा कचराकुंडय़ा, अथवा नको त्या ठिकाणी उघडय़ावर टाकून देणे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातकच आहे. त्याशिवाय असा जैविक कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट न लावताच टाकणे धोकादायक आहे. त्यामुळे शासनानेच दररोज जमा होणारा जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय अथवा खासगी रुग्णालय, हॉस्पिटल्स जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हयगय करताना फारसे आढळून येत नाहीत. त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून लाल, पिवळय़ा, हिरव्या रंगाच्या बकेटमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येते. त्यानंतर जैविक कचरा पैसे मोजून ठेकेदारी पध्दतीवर नियुक्त केलेल्या खासगी अथवा शासकीय एजन्सीमार्फत जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र काही खासगी हॉस्पिटल पैसे वाचविण्यासाठी जमा होणारा जैविक कचरा अंधाराचा फायदा घेऊन उघडय़ावरच टाकून देत आहेत.

जैविक कचरा दररोज वाहून नेण्यासाठी प्रत्येक खाटेसाठी दिवसाकाठी दहा रुपये तर १० खाटांसाठी वर्षांकाठी ३० हजार रुपये खासगी एजन्सीला  मोजावे लागत असल्याचे उरण मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दररोज ७ ते ८ किलो पर्यंतच जैविक कचरा जमा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौतम देसाई यांनी दिली. तर कोप्रोली आरोग्य केंद्रात दररोज २ ते ३ किलो जैविक कचरा जमा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी दिली. शासनाकडून जैविक कचरा  विल्हेवाटीसाठी निधी मिळतो. यातून मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या एजन्सीमार्फत योग्य प्रकारे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचे काम केले जात असल्याचे उरण तालुका आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase organic waste organic waste hospitals laboratories hospitals ysh

ताज्या बातम्या