प्रवासी संख्या वाढविण्यासाठी ‘एनएमएमटी’ प्रशासनाकडून तिकीटदरात कपात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : करोनानंतर नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असून वातानुकूलित बसचे तिकीट दर कमी केले आहेत. मात्र विद्युत बसचे प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आलेल्या दरांत वाढ करण्यात आली आहे. या बदलामुळे ‘एनएमएमटी’च्या प्रवासी संख्येत वाढ होईल असा दावा प्रशासनाने केला आहे.

नवी मुंबई परिवहन बस सेवा तोट्यात सुरू आहे. करोनानंतर हा तोटा वाढला आहे. करोनापूर्वी प्रवासी संख्या वाढावी म्हणून ‘बेस्ट’ च्या तिकीट दरांत मोठी कपात करण्यात आली होती. नवी मुंबईतही महत्त्वाच्या मार्गांवर बेस्टची बस सेवा दिली जाते. त्यामुळे काही प्रमाणात ‘एनएमएमटी’ची प्रवासी संख्या घटली होती. मात्र नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आपले तिकीट दर कायम ठेवले होते. त्यानंतर करोना परिस्थिती निर्माण झाल्याने बस सेवेवरही मोठा परिणाम झाला होता. आता करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने आपली बससेवा पूर्ववत केली आहे. मात्र तोटा वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवासी संख्येत वाढ व्हावी म्हणून वातानुकूलित बसच्या तिकीट दरात कपात केली आहे. ही कपात ३ ते ४० टक्केपर्यंत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दिवसाला दीड लाख प्रवासी एनएमएमटीच्या बसने प्रवास करीत आहेत, ती प्रवासी संख्या वाढवून अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कमीत कमी २ ते ३ किमी अंतरासाठी १५

रुपये भाडे आकारले जात होते, ते आता १० रुपयांवर कमी करण्यात आले आहे. सुरुवातीला तोटा सहन करावा लागेल परंतु नंतर प्रवासी वाढल्यावर त्याचा परिवहनाला फायदा होईल अशी अपेक्षा एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रवासी बस पास योजना

’ ५ दिवसांचे भाडे; ७ दिवस प्रवास

’ २०  दिवसांचे भाडे; ३० दिवस प्रवास

’ ५५ दिवसांचे भाडे; ९० दिवस प्रवास

’ १०० दिवसाचे भाडे; १८० दिवस प्रवास

’ १८० दिवसाचे भाडे ; ३६० दिवस प्रवास

’ सर्वसाधारण बस मासिक मॅजिक पास ३ हजार ५००रुपये

(सर्वसाधारण बसमधून महिनाभर आवडेल तेथे प्रवास)

’  व्होल्वो व विद्युत वातानुकूलित बस मासिक मॅजिक पास ५०००

’  (सर्वप्रकारच्या बसमधून महिनाभर आवडेल तेथे प्रवास)

विद्युत बसच्या तिकीटदरात वाढ

नवी मुंबईत सध्या ‘एनएमएमटी’कडून विद्युत बसची सेवा सुरू करण्यात आली असून पुढील काही दिवसांत १५० बससेवा देणार आहेत. प्रशासनाने सुरुवातीला ही बससेवा सुरू केली तेव्हा साध्या बसचे तिकीट दर आकारले होते. वातानुकूलित बसमधून साध्या दरात प्रवास करता येत असल्याने प्रवाशांत समाधान होते. मात्र आता या बसची सेवा महागणार आहे. प्रशासनाने दोन ते तीन किलोमीटरच्या टप्प्यासाठी २ ते ३ रुपये वाढविले आहेत. पूर्वीच्या वातानुकूलित बसच्या दरात आता ही सेवा मिळणार आहे.

नवीन सवलती

’ १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना बसेसमध्ये तिकिटात ५० टक्के सवलत.

’ शहरातील ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

’ विद्यार्थ्यांसाठी मासिक पास ५० टक्के सवलतीत

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase the number of passengers nmmt administration reduces ticket prices akp
First published on: 26-10-2021 at 00:06 IST