नवी मुंबई : गेला महिनाभर एक अंकी असलेली करोना रुग्ण संख्येत वाढ होत ती आता दोन अंकी झाली आहे. गुरुवारी शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या दहापर्यंत गेली आहे. त्यामुळे दैनंदिन करोना चाचण्या पाच हजारांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्च राजी शहरातील करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या १० इतकी होती. गुरुवारी शहरात दहा करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे तीन हजारांपर्यंत होत असलेल्या करोना चाचण्या आता पाच हजार केल्या आहेत.
करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी शहरातील करोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. शासनाकडूनही सर्वच पालिकांना सतर्कतेचे निर्देश प्राप्त झाले आहेत. आणखी रुग्णवाढ झाल्यास बंद केलेले वाशी प्रदर्शनी केंद्रातील करोना रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.




नवी मुंबईत करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे, परंतु आता रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. मुखपट्टीचा वापर करावा.
– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त