एक दिवसाच्या सहलीसाठी सर्वसामान्य नागरिक पिरवाडी समुद्रकिनाऱ्याला पसंती देऊ लागल्याने येथील गर्दी वाढताना दिसत आहे. या ठिकाणी मिळणारे ताजे मासे, घरगुती जेवण तसेच नारळपाण्याच्या ओढीने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील अनेक दिवसांपासून वाढ झालेली आहे. विशेष करून रविवारी व सुट्टीच्या दिवशी येथे मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. स्थानिक व्यावसायिकांनाही याचा लाभ होत आहे.
पर्यटन व्यवसायाला गेल्या काही वर्षांत उभारी आल्याने फिरण्याची नवनवीन ठिकाणे शोधली जात आहेत.
यामुळे पिरवाडी किनाऱ्यानेही कात टाकली असून खवय्येगिरी भागविणारी शाकाहारी तसेच मांसाहारी हॉटेल येथे उभी राहिली आहेत. राहाण्याची चांगली सोय असणारी हॉटेलही येथे उपलब्ध होत आहेत. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असून जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत.
