IND vs SA World Cup Final Navi Mumbai – नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर रविवारी दुपारी होणाऱ्या महिलांच्या एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी सकाळपासूनच स्टेडियम परिसरात गर्दी केली आहे. तसेच नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरात भारतीय खेळाडूंची जर्सी, टोपी तसेच तिरंगी झेंडा घेण्यासाठी स्टेडियमच्या परिसरात झुंबड उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारी सुरू होणाऱ्या सामन्यापूर्वी स्टेडियम परिसरात नवी मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

भारतीय महिला संघाने यापूर्वी २००५ व २०१७ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही. त्यामुळे आज नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम वर घरच्या मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळणार असून यंदा महिला विश्वचषक प्रथमच जिंकण्याची आशा क्रीडा रसिक ठेवून आहेत. अंतिम सामना रंगणाऱ्या डी . वाय पाटील स्टेडियम परिसरात भारतीय तिरंगा झेंडा १०० ते २०० रुपये तसेच भारतीय खेळाडूंची जर्सी २०० रुपये व भारतीय खेळाडूंची टोपी १०० ते दीडशे रुपये स्टेडियम परिसरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांची मोठी गर्दी या परिसरात पाहायला मिळत आहे . दुसरीकडे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी व्हायला मिळत असताना दुसरीकडे देश-विदेशातील प्रेक्षकही उपस्थित असल्याचे दिसत आहे.

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी स्टेडियम परिसरात क्रीडा रसिकांकडून ‘ भारत माता की जय’ चा जयघोष केला जात आहे. क्रीडा रसिकांमध्ये या अंतिम सांगण्यासाठी मोठी उत्सुकता असल्याचे चित्र स्टेडियम परिसरात दिसत आहे.