नवी मुंबई : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज (रविवार) दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीची सर्व तयारी पूर्ण झाली असली, तरी हजारो क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य महिला संघांमध्ये रंगणाऱ्या अंतिम सामन्याची सर्व तिकिटे ‘सोल्ड आऊट’ झाली असून, काही ठिकाणी या तिकिटांची पुनर्विक्री तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत होत असल्याची चर्चा आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची अंतिम लढत आज नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांचा विश्वविजेतेपदासाठीचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने देशभरात प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, अधिकृत तिकीट विक्री संकेतस्थळावर “सोल्ड आऊट” असा संदेश दिसत असल्याने अनेक चाहत्यांची प्रत्यक्ष मैदानात सामना पाहण्याची संधी हुकली आहे.

तिकिटे उपलब्ध नसल्याने काही जणांनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर, “तिकिट विक्रीबाबत वेळेवर माहिती दिली असती, तर चाहत्यांचा उत्साह कमी झाला नसता,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काही संकेतस्थळांवर प्रचंड दराने विकल्या जाणाऱ्या तिकिटांविषयी तक्रारही केली आहे. अनेकांच्या मते काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचे दर १५० रुपये इतके होते. मात्र,काही संकेत स्थळांवर हीच तिकिटे ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत विकली गेल्याची माहिती काही क्रिकेट रसिकांनी दिली. तर एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, काही तिकिटांचे दर तब्बल १.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी डी.वाय.पाटील स्टेडियमच्या व्यवस्थापनाकडून क्रिकेट रसिकांसाठी स्टेडियमच्या गेटवर तिक्रिट विक्रीची सोय करून देण्यात आली होती. मात्र, भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर गेल्या तीन दिवसांपासून ही तिकीट विक्री बंद असल्याचे क्रिकेट रसिकांनी सांगितले.

काही क्रिकेट रसिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपांत्य सामना आणि अंतिम सामना डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याने दोन्ही फेऱ्यांसाठीची तिकीट विक्री ही एकत्रच सुरू करण्यात आली होती. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वीच सर्व तिकिटांची विक्री झाली. परिणामी, संपूर्ण देशाचे लक्ष असलेला हा सामना प्रत्यक्ष बघण्याची अनेकांची संधी हुकली आहे.

दरम्यान, शहरातील कॅफे आणि पब, सोसायट्यांमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहेत. अनेकांनी आपापल्या मित्रपरिवारासह हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी तयारी केली आहे.

आजचा सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार असून, रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालणार आहे. सामन्यासाठी क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.