नवी मुंबई : वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या कोविड रुग्णालयात छतावरील दिव्यांच्या तीव्र प्रकाशझोतांमुळे रुग्णांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी डोळ्यांवर प्रकाशकिरणे येत असल्याने रुग्णांना पुरेसा आराम मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रदर्शनी केंद्रातील दिव्यांच्या प्रखर झोतामुळे रुग्णांची रात्रीची झोप होत नाही. याठिकाणी तातडीने तुलनेने मंद प्रकाश असलेल्या दिव्यांची सोय केली जाईल, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात रुग्णालय सुरू करण्यात आले. प्रदर्शनी केंद्राच्या इमारतीच्या विशिष्ट रचनेमुळे काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक खाटांजवळ दिव्यांचा प्रखर प्रकाश पडत आहे. हे दिवे रात्रंदिवस सुरू राहिल्याने त्यांच्या झोतामुळे अनेकांची झोपमोड होत आहे. वातावरणात आद्र्रता आणि उष्णतेमुळे तीव्र उजेडाच्या वीज दिव्यांमुळे रात्रीच्या झोपेवरही परिणाम होत आहे. करोनाग्रस्तांना  किमान सात ते आठ तास झोपेची आवश्यकता असते. परंतु, प्रखर दिव्यांमुळे विश्रांतीचा विचका झाला आहे. त्यामुळे रुग्णांनी रात्रीच्या वेळी मंद प्रकाशांच्या दिव्यांची आणि अतिरिक्त पंख्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.