मुंबईतील वांद्रे-कुर्ला वाणिज्य संकुलाच्या धर्तीवर खारघर येथे सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कार्पोरेट पार्कसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सात वास्तुविशारदांवर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात उभा राहणारा हा केसीपी बीकेसीपेक्षा वेगळा असेल, असे सांगितले जाते. बीकेसीमधील  चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तेथील विकास आराखडय़ाचा अभ्यास देखील सिडको करत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २० वर्षांपूर्वी खाडीक्षेत्रात भराव टाकून बीकेसी वाणिज्य संकुल उभारले. कॉर्पोरेट जगतासाठी पर्वणी ठरलेल्या या संकुलात दक्षिण मुंबईतील अनेक बडय़ा कंपन्या, परदेशी दूतावास आणि बँकांनी आपली कॉर्पोरेट कार्यालये सुरू केली. त्याच धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेंट्रल पार्क आणि गोल्फ कोर्सच्या नयनरम्य परिसरात १२० हेक्टर जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्कची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी देश-विदेशातील वास्तुविशारदांना त्यांच्या संकल्पना कागदावर उतरविण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. बदलत्या कॉर्पोरेट जगताला सामावून घेणाऱ्या देश विदेशातील २४ वास्तुविशारदांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील सात वास्तुविशारदांच्या आराखडय़ांना सिडकोने पंसती दिली आहे.

यात सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका, इंग्लड, फ्रान्समधील वास्तुविशारदांचा समावेश असून मुंबई, बंगळूरु आणि नवी दिल्लीतील काही वास्तुविशारदांनी परदेशी वास्तुविशारद समूहांबरोबर सामंजस्य करार करून आपले आराखडे सादर केले आहेत. सिडकोने या सात वास्तुविशारदांना अद्याप त्यांचे आराखडा तयार करण्याचे संमतीपत्र न दिल्याने ही सात नावे प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. पाच तज्ज्ञांच्या समितीने त्यांची नियुक्ती केली आहे. जगातील कॉर्पोरेट कार्यालयांचे प्रतिबिंब असलेल्या या विकास आराखडय़ाची अमंलबजावणी मात्र सिडको करणार आहे. येत्या सहा महिन्यांत हे वास्तुविशारद आपला विकास आराखडा सादर करतील आणि त्यानंतर केपीसीच्या कामाला सुरुवात होईल. सिंगापूरप्रमाणे एकाच रंगाढंगाच्या इमारती असाव्यात असा सिडकोचा प्रयत्न आहे. बीकेसी मुळे एमएमआरडीएचे अस्तित्व कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे केपीसीच्या उभारणीमुळे सिडकोचे भवितव्य कायम राहणार आहे.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या कॉर्पोरेट पार्कमुळे नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यासाठी जगातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वास्तुविशारदांकडून केपीसीचा विकास आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. विमानतळ कामाबरोबरच या कॉर्पोरेट जगताचीही समांतर उभारणी केली जाणार आहे.

– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको