नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएल सामान्यांसाठी नवी मुंबई परिवहन उपक्रमाने वाहनतळ ते मैदान अशा विशेष बसची सुविधा दिली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १३ सामने या मैदानात झाले असून यातून एनएमएमटीला दहा लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
नवी मुंबई शहरातील नेरुळ येथील डॉ.डी. वाय. पाटील मैदानात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामने झाले नाहीत. एकदिवशीय एका सामान्याचे आयोजन या मैदानावर करण्यात आले होते. परंतु त्यावेळीही पावसामुळे ऐनवेळी सामना रद्द करण्यात आला होता. परंतु आयपीएल सामन्यांसाठी या मैदानाला पसंती दिली जाते. यावर्षी आयपीएलचे २० सामने या मैदानावर आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील तेरा सामने आतापर्यंत झाले आहेत.
या सामन्यांसाठी महापालिका प्रशासनाने पार्किंगसाठी व्यवस्था केली आहे. वंडर्स पार्क, यशवंतराव चव्हाण मैदान तसेच रहेजा व माईंन्ड स्पेस या ठिकाणी वाहनतळ व्यवस्था केली आहे. परंतू या वाहनतळांपासून या मैदानात जाण्यासाठी एनएमएमटीची विशेष बस सेवाही देण्यात आली. नेरुळ रेल्वेस्थानकापासून ही बस सुविधा देण्यात आली आली. सामना पाहण्यासाठी मैदानात जाण्यासाठी व सामना संपल्यानंतर वाहनतळापर्यंत जाण्यासाठी एनएमएमटीच्या बसगाडय़ांचा वापर करण्यात येत होता. प्रत्येक सामन्यावेळी सरासरी १५ बस या वाहतुकीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातून पालिकेला प्रत्येक सामन्यागणिक एक लाखाचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली आहे.
आयपीएलचे शहरात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामने होत असून प्रवासाच्या सुविधेसाठी एनएमएमटीकडून बसगाडय़ांची सुविधा देत आहे. २५ बसगाडय़ांच्या माध्यमातून एनएमएमटीला प्रत्येक सामन्यागणिक उत्पन्नात एक लाखाची वाढ होत आहेत. तसेच सामन्यासाठी येणारे प्रेक्षकही सुविधेबाबत समाधानी आहेत. – योगेश कडुस्कर, एनएमएमटी, व्यवस्थापक
नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएलचे सामने बघण्यासाठी गेल्यावर नेरुळ स्टेशनपासून पालिकेने बसची सुविधा केलेली आहे. त्याचा आम्हाला फायदा होतो. काही वेळातच मैदानाजवळ पोहचता येते. मोठी पायपीट वाचते.– मंगेश कदम, माटुंगा