नवी मुंबई : मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे चटके आता भारतालाही बसू लागले असून त्याचे पडसाद आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. आयात साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मसाला बाजारातील सुकामेव्यच्या दर वाढीची चिन्हे दिसत आहेत.
दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाल्यानंतर समुद्री मार्गांवरील तणाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम आयात-निर्यात व्यवहारांवर झाला असून जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सुमारे १,१०० कंटेनर अडकून पडले आहेत. या कंटेनरमध्ये सुकामेवा आणि इतर आयात मालाचा समावेश असल्याने बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होत आहे. माल विलंबाने पोहोचत असल्याने व्यापाऱ्यांना अतिरिक्त वाहतूक आणि साठवणूक खर्चाचा सामना करावा लागत आहे.
एपीएमसी ही देशातील सुकामेव्याची प्रमुख घाऊक बाजार मानली जाते. इराणमधून मोठ्या प्रमाणावर पिस्ता, बदाम आणि खजूर मुंबई एपीएमसीच्या मसाला बाजारात आयात होतात. रमजान निमित्त सुक्यामेव्याला मागणी वाढलेली असताना बाजारात सुक्यामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या प्रामुख्याने इराणी पिस्ता आणि उच्च प्रतीच्या बदामांच्या घाऊक दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नव्या खेपा उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन काही व्यापारी मर्यादित प्रमाणातच माल बाजारात आणत आहेत. परिणामी सुक्यामेव्याचे दर चढेच राहण्याचा कल दिसत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, संघर्ष दीर्घकाळ चालल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. विमा प्रीमियममध्ये वाढ, जहाजवाहतुकीतील अडथळे आणि चलनातील चढ-उतार यामुळे आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम थेट एपीएमसीतील घाऊक व्यवहारांवर आणि पुढे किरकोळ बाजारावर होऊ शकतो.एकूणच, इराण-इस्रायल संघर्षाचे चटके आता मुंबई एपीएमसीपर्यंत पोहोचले असून सुकामेवा विभागात दर वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. खजूर बाजार सध्या स्थिर असला तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
ब्लर्ब
एपीएमसी ही देशातील सुकामेव्याची प्रमुख घाऊक बाजार मानली जाते. इराणमधून मोठ्या प्रमाणावर पिस्ता, बदाम आणि खजूर मसाला बाजारात आयात होतात.
खजूर बाजार अद्याप स्थिर
रमजाननिमित्त खजुराची वाढती मागणी लक्षात घेता मुंबई एपीएमसीमध्ये खजुराचा सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. परिणामी, घाऊक दरात मोठी उसळी अद्याप दिसलेली नाही. मालाच्या पूर्वनियोजित खेपा वेळेत दाखल झाल्याने तातडीचा तुटवडा टळल्याचे व्यापारी जयदीप पिसाळ यांनी सांगितले. इराणी खजूराला भारतात मागणी असली तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणी खजूर बाजारात कमी प्रमाणात येत असून तुलनेने महाग आहे. मात्र, एकूण बाजारावर त्याचा तितकासा परिणाम झालेला नाही. मात्र दोन्ही देशांमध्ये संघर्ष लांबला तर पुढील आयातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
