उरण : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन फेब्रुवारी महिन्यात ही वातावरणात धुक्याचे पसरलेले असते दिवसाही पडणारे हे थंडीचे धुके आहे की धुरके असा प्रश्न पडला आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे वारंवार धूलिकणात वाढ होत असल्याने उरणमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवसभर धुरक्याचे वातावरण निर्माण झाली आहे. यामुळे दृश्यमान कमी असल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

उरण तालुक्यात अनेक दिवसांपासून ढगाळ आणि धुक्याचे वातावरण आहे.या ढगाळ वातावरणाचा येथील आंबा आणि इतर नगदी पिकांना फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी उरण परिसरात पावसाने ही हजेरी लावली होती. त्यामुळे उरणच्या आंबा पीक धोक्यात आले होते. यात आंब्याचा मोहर गळल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केली होती. उरण आणि पनवेल या दोन्ही तालुक्यातील मार्ग आणि येथे जाळण्यात आलेला कचरा यामुळे धूलिकणात वाढ झाली आहे. साधारणपणे सकाळी ७ ते १० वाजताच्या दरम्यान थंडीत धुके पडते. मात्र दिवसभर पडणाऱ्या धुक्यामुळे वाढत्या प्रदूषणाची भीती व्यक्त केली जात आहे. यात धुके आणि धुरके यातील फरक नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे धुरक्यापासून बचाव करण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडला आहे.

उरणमधील वाढते धूलिकण कमी करण्यासाठी येथील राष्ट्रीय महामार्गावरील मार्गातील धूळ सफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे थंडी लांबणीवर पडली होती. मात्र काही दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे पहाटे धुके पडत आहे. मात्र हे धुके दिवसभर पडत आहे. हे धुरके पसरत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांकात बदल

सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांकातही बदल होऊन वाढ होत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक १८० पर्यंत पोहचला होता. याचाच अर्थ हवा प्रदूषण वाढत आहे.