बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी येथील एका जाहीर कार्यक्रमात स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपामध्ये महिलांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्यांना नेहमीच डावलले जाते. दोन वेळा जनतेमधून निवडून आल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपाच्या एकूण महिलाविषयक धोरणावर टीका केली. मंदा म्हात्रे यांच्या टीकेचा रोख हा स्थानिक भाजपा नेत्यांवर होता. यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंदा म्हात्रेंवरुन गणेश नाईकांचे नाव न घेता टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“साहेबांनी गणेश नाईकांचे महत्त्व वाढवले. मंदा म्हात्रे आपल्यासोबत प्रामाणिक होत्या. त्यांनी पक्षात परत यावं हे मलाही वाटते. पण त्या आल्या पाहिजेच ना. कारण त्यांचा आनंद वेगळा असतो. त्यांना टपली मारायला फार आवडते आणि ती सध्या मारायला मिळते त्यांना. त्या अशा ऐकणाऱ्यातल्या नाहीत. नवी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस येतात आणि मंदा म्हात्रेंच्या कार्यक्रमाला जातात,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भाजपामध्ये महिलांचा योग्य सन्मान राखला जात नाही व त्यांना डावलले जाते, अशी खदखद आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतीच व्यक्त केल्यानंतर त्याची दखल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती. मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

काय म्हणाल्या होत्या मंदा म्हात्रे?

पक्षाने २०१९ ला उमेदवारी दिली नसती, तर मी अपक्ष लढणार होते. तसे मी वरिष्ठांना सांगितले होते. मी कुणालाही घाबरत नाही. पहिल्यांदा २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून आल्याचा आरोप माझ्यावर केला गेला. पण २०१९ ला मोदी लाट नसताना मी स्वत:च्या कामामुळे प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचा दावा मंदा म्हात्रे यांनी केला होता.

“मला आजही संघर्ष करावा लागत आहे. एखादी स्त्री चांगले काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. त्यांची छायाचित्रे फलकावर वापरायची नाहीत, कार्यक्रमाला आमंत्रित करायचे नाहीत, असे प्रकार भीतीमुळे सुरू होतात. पण न घाबरता आपण आपले काम सुरू ठेवायचे, असे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. मला उमेदवारी दिली किंवा नाही, तरी मी लढणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticizes ganesh naik manda mhatre abn
First published on: 25-10-2021 at 17:19 IST