उरण : जेएनपीए बंदरातून मुंबई गेट वे ऑफ इंडिया अशी जलवाहतूक सुरू असते. मात्र पावसाळ्यात खवळणाऱ्या समुद्रापासून सावधानता म्हणून या जलमार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील प्रवासी बोटी गेट वे ऑफ इंडियाऐवजी भाऊचा धक्का येथून ये-जा करणार असल्याची माहिती जेएनपीए जलवाहतूक विभागाने दिली.

जेएनपीए बंदर ते मुंबई अशी जलवाहतूक सेवा गेल्या ३७ वर्षांपासून सुरू आहे. पावसाळ्यात वादळी वारे, समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटा यामुळे गेट वे ऑफ इंडियापर्यंत प्रवासी बोटींना प्रवास करणे धोक्याचे ठरते. त्यामुळे गेट वे ते अलिबाग, त्याचप्रमाणे गेट वे ते घारापुरी (एलिफंटा) येथील जलसेवाही बंद करण्यात येते. मात्र उरणच्या मोरा ते मुंबई या जलमार्गावरील वाहतूक बारमाही सुरू असते. त्याचप्रमाणे जेएनपीए ते मुंबई ही जलवाहतूकही सुरू ठेवण्यात येते. मात्र पावसाळ्यात या सेवेच्या मार्गात बदल केला जातो. जेएनपीए ते मुंबई जलमार्गात पावसाळ्यात समुद्राच्या भरतीमुळे समुद्रात ४ ते ५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. या काळात गेट वे ऑफ इंडिया येथील लाटांचा प्रवासी बोटींना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या परिसरातील बोटी बंद करण्यात येतात. या वेळी जेएनपीए ते गेट वे ऑफ इंडियाऐवजी ही सेवा जेएनपीए ते भाऊचा धक्का अशी सुरू करण्यात येते.

सेवेचा लाभ कसा?

जेएनपीए लँडिंग जेट्टीवरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू असते. त्यासाठी जेएनपीए कामगार वसाहतीमधून बस सेवा आहे. दर तासाने मुंबईसाठी बोट सुटत असल्याने ही सेवा थेट जेट्टीपर्यंत आहे. या जलमार्गाने जेएनपीए बंदरातील कामगार, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी ही सेवा अत्यल्प शुल्कात आहे. तर बंदरावर आधारित उद्योगात काम करण्याऱ्या अधिकारी, कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिकांना या सेवेचा लाभ घेता येतो.

विनाअडथळा प्रवास

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अनेक ठिकाणी उड्डाणपूल व पर्यायी मार्गांची उभारणी केली जाते. मात्र तरीही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र जेएनपीए ते मुंबई हा एक तासाचा प्रवास विनाअडथळा आणि प्रदूषणमुक्त प्रवास मानला जातो.

दरवर्षीप्रमाणे जेएनपीए ते मुंबई जलमार्गात पावसाच्या कालावधीसाठी बदल करण्यात आला आहे. ही सेवा पावसाळ्यानंतर पुन्हा पूर्ववत होणार आहे.-कॅप्टन बाळासाहेब पवार, जलवाहतूक विभाग, जेएनपीए