उरण : जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाच्या पागोटे ते चिर्ले या भागातील सेवा मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने वाहन चालक त्रस्त असून हा मार्ग बंद असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. परिसरातील पावसामुळे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पागोटे उड्डाणपूल ते चिर्ले अटलसेतू दरम्यानच्या सेवा मार्गाच्या दुरुस्ती चे काम रखडत रखडत सुरू आहे.३० कोटी खर्चाच्या या अपूर्ण कामामुळे मात्र वाहतुकदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उरण परिसरातील राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पागोटे उड्डाणपूल ते चिर्ले अटलसेतू दरम्यान सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते.खड्ड्यांमुळे या रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली होती.

त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने चालवणे अगदी अवघड होऊन बसले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत सेवा मार्गाच्या मजबुतीकरण व कॉक्रीटकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली होती.मात्र जोरदार पावसामुळे ही कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.यामुळे सुमारे ३० कोटी रुपये खर्चाची सर्व्हिस रोडचे मजबुतीकरण व कॉक्रीटकरण करण्याची कामे रखडली आहेत.अर्धवट कामांमुळे वाहनांसाठी हे सेवा मार्ग सध्या तरी बंदच आहेत .बंदमुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अखत्यारीतील गव्हाण फाटा ते जासई उड्डाणपूल पर्यंतचे दुतर्फा रस्ते व सेवा मार्गही दरवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस पडताच गुडघाभर पाणी साचून राहते.पाण्याचा निचरा होत नसल्यानेच दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीसाठी रस्त्यावर वाहने चालवणे वाहनचालकांना अवघड होऊन बसते. त्यामध्ये दुतर्फा सेवा मार्गावर कायम कंटेनर ट्रेलर व अवजड वाहनांची अवैधरित्या मोठ्या पार्किंग केल्या जातात.यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील

पागोटे उड्डाणपूल ते चिर्ले अटलसेतू दरम्यानच्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व कॉक्रीटकरण करण्याचे सुमारे ३० कोटी खर्चाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.१६ दिवसांच्या मुदतीत हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा होती.मात्र पावसामुळे कामाला ब्रेक लागल्याने रस्त्यांचे कामे अर्धवट राहिलेले असल्याची माहिती एन एच आयचे विभागीय अधिकारी रवींद्र इंगोळे यांनी दिली.