उरण : इराण व इस्रायल यांच्यामधील युद्धामुळे देशातून जाणाऱ्या व परदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांचा मार्ग बंद झाला असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदरातून निघालेली जहाजे पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत तर बंदरात अनेक जहाजे अडकून पडली आहेत. परिणामी जेएनपीए बंदराच्या मालवाहतूक आणि व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम जेएनपीए बंदरावरही होण्याची शक्यता वाढली आहे. युद्धापूर्वी बंदरातून निघालेली जहाजे माघारी परतू लागली आहेत. यासाठी परदेशातून मालवाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्यांनीही जहाजे माघारी बोलावली आहेत. तर बंदरातून माल घेऊन जाणारी अनेक जहाजे युद्धामुळे प्रतीक्षेत आहेत.
बंदरातील जहाजांचे आवागमन थांबल्याने अशीच स्थिती राहिल्यास बंदरातून होणाऱ्या आयात निर्यातीवरही हळूहळू परिणाम होऊ लागला आहे. काही दिवसांपासून जेएनपीए बंदरातून निर्यात करण्यात येणाऱ्या फळांचे कंटेनर अडकून पडले आहेत. यात या युद्धामुळे भर पडली आहे.
कंटेनर वाहनांच्या रांगा
इराण इस्रायल युद्धाच्या परिणामी जहाजांची संख्या कमी झाल्याने जेएनपीए बंदर परिसरात मालवाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून बंदर परिसरात वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.
