उरण : जेएनपीए बंदरातील माल वाहतूक ही १३ ०६ टक्क्यांनी वाढल्याने जगातील ३० प्रमुख बंदरात २८ व्या स्थानावरून २१ व्या स्थानी झेप घेतली आहे.भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या 2026च्या पहिल्या सहामाहीतील (H1 2026) जगातील प्रमुख 30 कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात 2025 मधील 28व्या स्थानावरून 21व्या स्थानावर झेप घेतली आहे. जेएनपीएने 2025 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 13.6 टक्के वाढ नोंदवली आहे.
गेल्या वर्षभरात कार्यात्मक कार्यक्षमता, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक जोडणी अधिक सक्षम करण्यावर जेएनपीएने सातत्याने भर दिला आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही जेएनपीएने मालाची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत आयात-निर्यात व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात जेएनपीए यशस्वी ठरले. आव्हानात्मक परिस्थितीतही व्यापार सुरळीत ठेवण्याची जेएनपीएची कार्यक्षमता आणि तत्परता ही जागतिक दर्जाच्या बंदरसेवांच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे द्योतक आहे.
जेएनपीएच्या या जागतिक क्रमवारीतील कामगिरीबाबत बोलताना, गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए म्हणाले, “जेएनपीएने जागतिक क्रमवारीत २१वे स्थान मिळवणे हे आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे जागतिक व्यापारातील वर्षभरातील आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वासार्ह आणि कार्यक्षम माल हाताळणी सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली आहे. या गतीला पुढे नेत, जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे स्थान आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील डेटा व व्यावसायिक माहिती सेवा पुरवणारी आघाडीची जागतिक संस्था असून, ती कंटेनर हाताळणीच्या प्रमाणाच्या आधारे जगातील बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते.या क्रमवारीत झालेली सुधारणा जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे वाढते स्थान अधोरेखित करते, तसेच भारताच्या सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासातील जेएनपीएची वाढती भूमिका महत्वाची ठरणार आहे.
