उरण : अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला व जेएनपीटी बंदराला जोडणारा जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीए ते आम्र मार्ग आठवडाभरापासून अंधारात आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील सर्वच्या सर्व पथदिवे बंद असल्याने अपघाताचा मोठा धोका आहे. यामुळे वाहनचालकांकडून वाहन चालवताना खबरदारी घेण्यात येत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.
दोन्ही राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय) ने उभारले आहेत. त्यामुळे या मार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही याच विभागाची आहे. मात्र या महामार्गावर होणाऱ्या अंधाराकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. या मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस उरणच्या नागरिकांना अंधारातच प्रवास करावा लागणार आहे. येथे ठिकठिकाणी खड्डे पडले असून उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. यामुळे या मार्गावरून वेगाने धावणाऱ्या जड व प्रवासी वाहनांना अपघाताचा धोका आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथील पथदिवे तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
अपघाताच्या प्रमाणात वाढ
– उरण ते नवी मुंबई तसेच पनवेल व पुणे या मुख्य शहराना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीमुळे येथील प्रवास सुखकर झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग अधिकचा असतो. या वेगामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यात दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत.
– सिडकोच्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती मे २०२४ मध्ये करण्यात आले आहे. मात्र अवघ्या काही महिन्यांतच हा मार्ग नादुरुस्त झाला आहे. यात जड कंटेनर वाहनांची संख्या जास्त असल्याने धोकादायक बनले आहेत. या मार्गावरील खडी उखडल्याने दुचाकीवरून प्रवास करणे कठीण होत आहे.
– जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाला हा सागरी महामार्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातून खोपटे आणि उरणच्या पूर्व विभागातील अनेक गोदामात ये-जा करणाऱ्या हजारो जड कंटेनर वाहनांमुळे हा मार्ग सतत वर्दळीला बनला आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरून उरण, द्रोणागिरी नोड, खारपाडा किंवा अलिबागला जाणारी लहान प्रवासी वाहनेही याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे जड व प्रवासी वाहनांसाठी हे अपघाताचे ठिकाण बनले आहे.
महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे एनएचआयकडून महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. १० एप्रिलला ही निविदा जाहीर होणार आहे. त्यानंतर महामार्गावरील पथदिवे सुरू होतील.- धीरज शहा, अभियंता, भारतीय रस्ते विकास प्राधिकरण.
