scorecardresearch

‘हिंदू टर्मिनल’विरोधात नोकरी बचाव आंदोलन; स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणल्याचा आरोप

तालुक्यातील हिंदू टर्मिनल या कंपनीने १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर प्रकल्प उभा करून करोडोंचा नफा कमविला व आता ३० एप्रिल २०२२ नंतर कंपनी बंद करत आहोत अशी नोटीस कामगारांना व संघटनेला दिली आहे.

उरण : तालुक्यातील हिंदू टर्मिनल या कंपनीने १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर प्रकल्प उभा करून करोडोंचा नफा कमविला व आता ३० एप्रिल २०२२ नंतर कंपनी बंद करत आहोत अशी नोटीस कामगारांना व संघटनेला दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात कामगार संघटना व ग्रामस्थांनी नोकर बचावसाठी आंदोलन केले. सिडकोने जमिनी संपादित केल्याने कंपनीशिवाय रोजगार उरलेला नाही. त्यामुळे ६०० कामगारांचे व त्यावर अवलंबून किमान ५००० स्थानिकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड पडणार असे दिसते आहे. त्यातच कंपनीकडून कोणताही ठोस निर्णय कामगारांना दिला जात नाही उलट कंपनीतील मशीनरी हलविण्याचा प्रयत्न करत आहेत.

याचाच जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कामगारांना संबोधित करताना एनएमजीकेएस संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कामगारांच्या हक्काची कायदेशीर देणी तसेच नुकसानभरपाई दिल्याशिवाय एकही मशीनरी बाहेर जाऊ देणार नाही. जर व्यवस्थापनाने बऱ्या बोलाने दिली नाही तर व्यवस्थापनाकडून बसून वसूल करू व कामगारांना न्याय मिळवून देऊ असे ते म्हणाले.या आंदोलनासाठी एनएमजीकेएस संघटनेचे विनोद म्हात्रे, पी. के. रामण, वैभव पाटील, किरीट पाटील, लंकेश ठाकूर, रवींद्र पाटील, प्रांजल भोईर, मूळ निवासी संघटनेचे संजय घरत, गणेश पाटील, सिटूचे मधुसूदन म्हात्रे, गावकमिटीचे रमेश ठाकूर, उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या संध्या ठाकूर, योगिता ठाकूर, स्वाती घरत, कृष्णा ठाकूर भेंडखळ ग्रामस्थ व शेकडोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job protection movement against hindu terminal accused bringing hammer employment locals amy