नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचत असतानाच नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात आता जुन्नर पट्ट्यातील हापूस आणि केशर आंबा दाखल होत आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादनाला फटका बसूनही ग्राहकांकडून या आंब्यांना मागणी कायम आहे.
सध्या दररोज सात ते आठ गाड्या भरून जुन्नर भागातील आंबा बाजारात दाखल होत असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी मार्चपासून कोकणातील देवगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातील हापूस आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होतो. त्याच काळात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधील विविध जातींच्या आंब्यांचीही आवक सुरू असते. मात्र मे महिन्याच्या अखेरीस कोकण हापूसचा हंगाम ओसरू लागला की बाजारात जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा परिसरातील हापूस आणि केशर आंब्याचे प्रमाण वाढते.
यंदाही हीच स्थिती दिसून येत असली, तरी हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक तुलनेने मर्यादित राहिली आहे.
फळ व्यापाऱ्यांच्या मते, एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी फळांचे नुकसान झाले. काही भागांत गारपिटीचाही परिणाम झाला. त्यामुळे दर्जेदार फळांचे प्रमाण कमी झाले असून, आकाराने लहान किंवा डाग पडलेल्या फळांची संख्या वाढली आहे. परिणामी, बाजारात चांगल्या प्रतीच्या आंब्याला तुलनेने अधिक मागणी आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीसही आंब्याची चव कायम असल्याने ग्राहकांचा कल अजूनही हापूसकडे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः मध्यमवर्गीय ग्राहकांकडून तुलनेने परवडणाऱ्या दरातील जुन्नर हापूसला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, उन्हाळा संपत आला असला तरी एपीएमसी फळ बाजारातील आंबा खरेदीची लगबग अद्याप कायम आहे. सुट्ट्यांचा हंगाम, घरगुती कार्यक्रम आणि आंबा रसासाठी होणारी खरेदी यामुळे बाजारात अजूनही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
कोकण हापूसच्या तुलनेत जुन्नर भागातील आंबा बाजारात थोडा उशिरा दाखल होतो. त्यामुळे मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला या आंब्याला चांगली मागणी असते. यंदा उत्पादन कमी असले तरी पुढील दोन आठवड्यांत आवक वाढण्याची अपेक्षा आहे. साधारण १५ ते २० जूनपर्यंत जुन्नर हापूसचा हंगाम सुरू राहू शकतो.
– संजय पिंपळे, व्यापारी
आंब्याचे दर
वाशी फळ बाजारात सध्या जुन्नर हापूसला दोन ते अडीच डझनांच्या पेटीसाठी ४०० ते ७०० रुपये दर मिळत आहेत, तर जुन्नर केशर आंबा ३० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
