पनवेल – पनवेलमधील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि काही निवडक पदाधिकारी केरळ राज्यातील प्रचारासाठी रवाना झाले आहेत. केरळ राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ज्या महापालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. अशा महापालिका क्षेत्रातील भाजपच्या लोकप्रतिनिधींना केरळी समर्थकांना केरळमध्ये घेऊन जाऊन हा प्रचार करण्याचे आदेश दिल्याचे समजते.  

पनवेल महापालिका निवडणुकीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री सूरेश गोपी यांनी पनवेलमध्ये येऊन भाजपच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला होता. त्याची परतफेड म्हणून पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या समर्थकांची फळी केरळमध्ये प्रचारासाठी पाठविल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलमध्ये विविध राज्यांतून आलेले नागरिक स्थायिक झाले असून, केरळमधून आलेल्या नागरिकांचा यात मोठा सहभाग आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हून अधिक कार्यकर्त्यांचा गट केरळमध्ये पाठविण्यात आला असून, त्यामध्ये नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हे कार्यकर्ते केरळमधील सभांमध्ये सहभागी होण्यासोबतच आपल्या नातेवाईक व परिचितांशी संपर्क साधून भाजपच्या कामांची माहिती देत आहेत.मात्र, या केरळ प्रचार मोहिमेमुळे पनवेलमधील स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजपच्या विरोधीपक्षाच्या गटाकडून होत आहे. पनवेलच्या अनेक भागांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम आहे.

कामगारांना स्वयंपाकासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा बाटला मिळत नाही अशा वेगवेगळ्या समस्या गंभीर बनल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत असून, तरीही लोकप्रतिनिधी परराज्यातील प्रचारात व्यस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी विमानप्रवासाची सोय करण्यात आल्याने अनेक कार्यकर्ते केरळ दौ-याकडे आकर्षित झाले आहेत. पनवेलमधील पाणी समस्या अधिवेशनात आमदार ठाकूर यांनी मांडल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही, त्यामुळे स्थानिक समस्या सोडविण्याऐवजी बाहेरच्या राज्यात प्रचाराला प्राधान्य देणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.