पालिकेच्या मदतीशिवाय गणेश मैदानात कबड्डीचे क्रीडांगण

सीवूड्स सेक्टर ४८ येथील मुलांनी एकत्र येऊन विभागातील गणेश मैदानात कबड्डीसाठी क्रीडांगण तयार करून पालिकेच्या क्रीडाविषयक अनास्थेवर बोट ठेवले आहे. या मैदानावर जवळपास १०० हून अधिक मुले दरोरोज कबड्डीचा सराव करतात. त्यातून नवी मुंबई महापालिकेतील क्रीडा अधिकारी असलेल्या अभिलाषा म्हात्रे यांच्याप्रमाणे आणखी एखादे नेतृत्व तयार होईलही. पण मुलांच्या या प्रयत्नांना पालिकेचा मदतीचा हात मिळणार का? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भारतीय महिला कबड्डी संघाने आशियाई चषक पटकावल्यानंतर शहरातील कबड्डीवर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांमध्ये उत्साह आहे. मात्र असे असताना कबड्डीतील हे कसब दाखविण्यासाठी नवी मुंबई शहरातील असंख्य तरुण धडपडत आहेत. मात्र शहरातील महागडय़ा क्लबमध्ये जाऊन या खेळांचे प्रशिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने सोयीसुविधांच्या अभावाने त्यांचे हे कसब झाकोळलेले आहे. म्हणूनच की काय, पण पालिका क्षेत्रात आजतागायत एकही कबड्डी प्रशिक्षण केंद्र बनविण्याची तसदी पालिकेने घेतलेली नाही. विशेष म्हणजे, शहरातील तसेच पालिकेतील ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कबड्डीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्रीडा विभागाने कोपरखैरणे येथील शाळेत कबड्डीचे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी संबंधित शहर अभियंता विभागाशी पत्रव्यवहारही झालेला आहे. पण हा प्रस्ताव कागदावरच राहिल्याने होतकरू खेळांडूची मात्र उपेक्षाच होत आहे.

शहरातील ७८ मैदानांपैकी अनेक मैदाने ही खेळण्यायोग्य नाहीत. नेरुळ येथील बामणदेव झोटिंगदेव मैदानाची नेरुळ गाव आणि परिसरातील मुलांनीच स्वच्छता केली. तर सीवूड्समधील गणेश मैदानावरदेखील परिसरातील मुलांनीच कबड्डीचे मैदान तयार करून खेळाप्रतिची आवड पूर्ण केली आहे. यासाठी अमोल बढे नामक तरुणाने स्वत:चा कार वॉशिंगचा व्यवसाय सांभाळत संध्याकाळी ७ ते १० पर्यंत मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या मैदानाकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. सर्वत्र कचरा पडलेला असून मैदानाचे लोखंडी प्रवेशद्वाराचा तुटलेल्या अवस्थेतील एकच भाग उरलेला आहे. याशिवाय मैदानासभोवताली असलेले लोखंडी कुंपणही तुटलेले आहे.

परंतु याचे काहीही सोयरसुतक पालिकेला नाही. या मैदानात दिवाबत्तीची सोय नाही. विशेष म्हणजे, सीवूड्समधील हे गणेश मैदान पालिकेच्या क्रीडा सभापतींच्या प्रभागातच आहे. असे असतानाही मैदानाची झालेली दुरवस्था कोणालाही दिसत नाही.

विभागातील विविध वयोगटांतील मुले एकत्र येऊन येथे कबड्डी खेळतात. मुलांनीच या मैदानात कबड्डीचे हे मैदान तयार केले आहे. दिवसभर स्वत:चा व्यवसाय सांभाळून संध्याकाळी येथील मुलांना कबड्डीचे मोफत प्रशिक्षण देतो. मात्र पालिकेने किमान या मैदानाची स्वच्छता आणि भौतिक सुविधा तरी पुरवाव्यात, एवढीच मागणी आहे.

– अनिल बढे, हौशी कबड्डी प्रशिक्षक, सीवुड्स.

मला कबड्डी खेळायला आवडते म्हणून आम्ही मुलांनीच एकत्र येऊन मैदान बनवले आहे. विभागातील सुधीर जाधव यांनी यासाठी थोडीफार मदत आणि प्रोत्साहन दिले. मात्र पालिकेने सुविधायुक्त मैदान बनवून दिले तर आणखी मुले येथे खेळायला येतील. यातून खेळाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीही मिळते.

– प्रथमेश तांडेल, स्थानिक खेळाडू,

मैदान व्हिजनअंतर्गत शहरातील सर्वच मैदानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. यासाठी शहरातील विविध मैदानांची पाहणीदेखील केली आहे. त्यानुसार लवकरच सर्वच मैदानांचा कायापालट होणार असून नवी मुंबईतील मुलांना खेळाशी निगडित चांगल्या सुविधा देण्यासंबंधीचा प्रस्ताव बनविण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मैदानांचा चेहरामोहर बदलणार आहे.

– विशाल डोळस, सभापती, क्रीडा समिती.

शहरातील विविध मैदानांच्या स्वच्छतेबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार सर्वच मैदानांना भौतिक सुविधा देण्याबाबत योग्य नियोजन करण्यात येत असून शहरातील तरुणांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई.