पनवेल : कळंबोली जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि सिडको महामंडळ प्रशासनाने मंगळवारी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासमोरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करत संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला. या कारवाईत वर्षानुवर्षे उभारण्यात आलेली पक्की व कच्ची बांधकामे जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमजीएम रूग्णालयासमोरील सेवा मार्गिका (कॉरिडॉर) मोकळा करणे आवश्यक होते. मात्र कामोठे येथील सेक्टर क्रमांक १ मधील सेवामार्गिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत बांधकामांमुळे प्रकल्पात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नियंत्रण विभागाचे मुख्य नियंत्रक विशाल ढगे आणि पनवेल महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अनधिकृत बांधकामांवर संयुक्त कारवाई करण्याचे निश्चित केले होते. त्यानूसार कामोठे येथील भूखंड क्रमांक एनए-६, सेक्टर-१ मधील सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रावरील एक पक्के बांधकाम तसेच सहा पत्राशेड स्वरूपातील कच्ची बांधकामे हटविण्यात आली. तसेच सेक्टर-६ए मधील भूखंड क्रमांक ३४ वर सुरू असलेले अनधिकृत पक्के बांधकामही तात्काळ पाडण्यात आले. 

या कारवाईवेळी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने, अधीक्षक दशरथ भंडारी, उमेश मडवी, सिडकोचे मुख्य बांधकाम नियंत्रक विशाल ढगे, नियंत्रक श्रीकांत पावसकर,  रावसाहेब देवकर यांच्यासह पनवेल महापालिका, सिडकोचे कर्मचारी, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कारवाईमुळे कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाला गती मिळणार असून वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची मोठी सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.