पनवेल : मुंब्रा–पनवेल महामार्गावरील कळंबोली गावासमोर अवजड वाहनाच्या धडकेने दिशादर्शकाचा लोखंडी मनोरा मंगळवारी पहाटे कोसळला. घटना घडली तेव्हा महामार्गावर वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अर्धा तासांत दिशादर्शक व लोखंडी मनोरा हटवून वाहतूक पूर्ववत केली.

मंगळवारी पहाटे सुमारे पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. मुंब्रा–पनवेल महामार्गावरील कळंबोली गावासमोरील दिशादर्शकाला एका अनोळखी अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेमुळे दिशादर्शकाचा लोखंडी मनोरा रस्त्यावर कोसळला. मात्र त्यावेळी महामार्गावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी अथवा अन्य अपघात झाला नाही.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. रस्त्यावर पडलेला लोखंडी मनोरा हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मदतकार्य वेळेत पूर्ण झाल्याने काही मिनिटांत वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांनी दिली.

संबंधित दिशादर्शक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारला होता. अवजड वाहनाच्या धडकेमुळे ही घटना घडली असली, तरी संबंधित दिशादर्शकाची संरचनात्मक सुरक्षितता तपासण्यात आली होती का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय खानावकर यांनी उपस्थित केला आहे.

मुंब्रा–पनवेल महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. धडक देणारे वाहन चालकासह घटनास्थळावरून पसार झाले असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच संबंधित दिशादर्शकाबाबतची माहिती कळंबोली वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसीकडे मागविली असून पुढील तपास सुरू आहे.