पनवेल : पावसाळ्यात शहर परिसरात पाण्याची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा असताना कळंबोली आणि रोडपाली उपनगरांतील नागरिकांना मात्र गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कळंबोलीला दररोज ३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्याच्या निम्म्याहून कमी म्हणजे केवळ २० ते ११ एमएलडीपर्यंतच पाणी मिळत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच रोडपालीच्या शेवटच्या टोकापर्यंत काही मिनिटेच पाणी पोहोचत असल्याने रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे या प्रभागाचे नेतृत्व पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील करीत असतानाही पाणीप्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

कळंबोलीतील रोडपाली भागाला सर्वाधिक कमी पाणी मिळत असल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर रोडपालीतील नागरिकांनी २६ जुलै रोजी पनवेल महापालिकेच्या स्थानिक नगरसेवकांची बैठक घेऊन पाणीपुरवठा नियमित कधी होणार तसेच विविध प्रश्नांकडे लक्ष्य वेधले. त्यावेळी या भागातील पाणीपुरवठ्याची सेवा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नसल्याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. मात्र मालमत्ता कर वसुलीसाठी आग्रही असलेल्या महापालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठ्यासारखी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप संतप्त रहिवासी करीत आहेत.

कळंबोलीसह सिडकोच्या उपनगरांना सिडको मंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल महापालिकेचे स्वतःचे धरण नसल्याने या भागातील पाणीपुरवठा व्यवस्था अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. दुसरीकडे सिडकोचा पाणीपुरवठा विभागही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (एमजेपी) अवलंबून आहे. एमजेपीकडून पाणी घेऊन सिडकोकडून कळंबोलीसह इतर सिडको उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो.मागील दहा दिवसांपासून कळंबोलीला निम्म्याहून कमी पाणी मिळत असल्याने रोडपालीतील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पाणीपुरवठ्याची वेळ अत्यल्प असल्याने अनेक रहिवाशांना पाणी साठवून ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सदनिका घेतलेल्या नागरिकांना आता नियमित पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातही कळंबोली आणि रोडपालीतील पाणीप्रश्नाने नागरिकांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

रोडपालीतील नागरिकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. त्यावर सिडकोच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी उत्तरात एमजेपीकडून सिडकोला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार मे आणि जून महिन्यात दररोज सरासरी २२.०७ एमएलडी, जुलैमध्ये १९.२० एमएलडी, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत १६.७६ एमएलडी पाणी मिळाले आहे.

कळंबोलीला गेल्या सात दिवसांत झालेल्या पाणीपुरवठ्याची आकडेवारीही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करते. १ ऑगस्टला १८.९३ एमएलडी, २ ऑगस्टला २०.४० एमएलडी, ३ ऑगस्टला २०.६२ एमएलडी, ४ ऑगस्टला १६.८५ एमएलडी, ५ ऑगस्टला १३.२३ एमएलडी, ६ ऑगस्टला १५.९७ एमएलडी, तर ७ ऑगस्टला सर्वांत कमी म्हणजे ११.३८ एमएलडी पाणी एमजेपीकडून सिडकोला मिळाले. त्यामुळे कळंबोलीतील पाणीपुरवठा आणखी घटल्याचे सांगितले जात आहे

“आम्ही ज्यांना मतदान केले, त्यांच्याकडे पाणीप्रश्नाबाबत आमच्या समस्या मांडल्या आहेत. मात्र आमच्याकडून मालमत्ता कर वसूल करणाऱ्या स्वराज्य संस्था म्हणजे पनवेल महापालिकेने पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर जबाबदारी झटकणे योग्य नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असेल, तर नेमकी अडचण कुठे आहे, याचा शोध तातडीने घेऊन ती दूर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. एवढे दिवस उलटूनही समस्या सुटत नसल्याने पावसाळ्यातही आम्हाला खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत महापालिका आणि सिडकोने नागरिकांना माफक दरात पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी आमची मागणी आहे.” — दीपक कस्तुरी, रोडपाली रेसिडेन्ट वेल्फेअर

असोसिएशन
“कळंबोली आणि रोडपाली नोडला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची असली, तरी पनवेल महापालिकेने या प्रश्नातून कधीही अंग झटकलेले नाही. उलट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि सिडको मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सिडकोकडून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची सूचनाही केली आहे. मात्र एमजेपीकडून आवश्यक प्रमाणात पाणीच उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरूच आहेत.” — प्रमिला पाटील, उपमहापौर, पनवेल महापालिका