पनवेल : कामोठे उपनगरातील सिडकोच्या भूखंडांवर परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या पाच बांबूशेडवर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने गुरुवारी कारवाई केली. सेक्टर ३५, ३२ आणि १९ मधील या शेडचे जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम करण्यात आले. पोलीस, सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. सिडकोच्या भूखंडांवर अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात आली.

कामोठे परिसरातील जागरूक नागरिकांनी सिडकोच्या भूखंडांवर बांबूशेड उभारून त्याठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन असल्याच्या तक्रारी सिडकोकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाला कारवाईचे निर्देश दिले.

त्यानुसार सेक्टर ३५ मधील भूखंड क्रमांक ९७ आणि ९७ अ वरील अनुक्रमे सुमारे २८० आणि २४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या दोन बांबूशेडचे पाडकाम करण्यात आले. सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक १३ वरील सुमारे ८०० चौ.मी. क्षेत्रफळाचे बांबूशेड, तसेच सेक्टर ३२ मधील भूखंड क्रमांक १ वरील सुमारे ५२५ आणि २०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या दोन बांबूशेडवरही कारवाई करण्यात आली.

सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून आणि सिडको महामंडळाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ही बांबूशेड उभारण्यात आली होती. कामोठे नोडचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक श्रीकांत पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये अनधिकृत बांधकामे विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सिडकोचे पोलीस पथक, सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते.