पनवेल : कामोठे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीजखंडितीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी रात्री मुख्य चौकात उत्स्फुर्तपणे रास्तारोको आंदोलन केले. वीजपुरवठा सुरळीत करण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणकडे जाब विचारला. मध्यरात्री वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कामोठे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. बुधवारी एका भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल २७ तास लागले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू झाला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता गेलेल्या विजेमुळे सततच्या व्यत्ययामुळे नागरिक वैतागले होते. मध्यरात्री झाली तरी परत विज येत नसल्याने अखेर नागरिक घराबाहेर पडले.  

वीजपुरवठा कधी हा प्रश्न विचारण्यासाठी रहिवाशांनी लहान मुलांसह रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. काही नागरिक महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयाकडे गेले, तर दुसरा गट कामोठे पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमला. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आणि नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

या दरम्यान महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी खारघर परिसरात तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या कामात गुंतले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री कामोठेतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन थांबवून घरी परतण्यास सुरुवात केली.

महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी सांगितले की, वाढत्या वीजमागणीमुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी युद्धपातळीवर काम करत होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती लोकसत्ताला दिली. 

आंदोलनादरम्यान नागरिकांनी, वीजबिल थकल्यास तातडीने कारवाई करणारी महावितरण यंत्रणा वीजपुरवठा खंडित झाल्यावर तत्परतेने सेवा का देत नाही, असा सवाल संतप्त वीजग्राहक शनिवारी रात्री विचारत होते. कामोठे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वीजेची वाढती मागणी लक्षात घेता स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याची मागणीही नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. मात्र मुंबईच्या प्रकाशगडावरील (महावितरणचे मुख्य कार्यालय) उच्चपदस्थांकडून या कामाला प्राधान्य दिले जात नसल्याने वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे.  कामोठेतील वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर काही मिनिटांसाठी कळंबोली परिसरातही वीजखंडितीची समस्या निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर तेथील वीजपुरवठाही सुरळीत करण्यात आला.