पनवेल: कामोठ्यात वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी रात्री रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरण प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली. सार्वजनिक सुटीनंतर सोमवारी सकाळी महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी सेक्टर ९ येथील उपकेंद्राला भेट देत वीज व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर अखेर ‘प्रकाशगडाला’ जाग आल्याची भावना अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.

कामोठ्यातील वारंवार होणाऱ्या वीजखंडितीला वैतागून रहिवाशांनी शनिवारी रात्री मुलाबाळांसह रास्तारोको करण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच महावितरण प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. यापूर्वीही कामोठेतील २७ तास सुमारे १५ हजार नागरिकांना वीजविना राहावे लागले होते. त्यानंतर पुन्हा शनिवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कार्यकारी संचालकांकडून आढावा सुरू असतानाच शेकापचे कार्यकर्ते उपकेंद्रावर धडकले. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा आंदोलनाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या संतप्त शेकापच्या पदाधिका-यांची समजूत काढत, मी तूमच्यासाठीच आलोय, अशी समज कार्यकारी संचालक औंढेकर यांनी काढली. 

घराबाहेर उकाडा आणि घरातील वीज वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या कामोठेकरांनी पोलीस ठाण्यात तसेच वीज उपकेंद्राच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी वीजेविना कसे जगायचे, असा प्रश्न नागरिकांसह पोलिसांनाही पडला होता. वाढलेली विजेची मागणी आणि त्यानुसार नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.

सोमवारी सकाळी कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी उपकेंद्राला भेट देऊन सध्याची वीज मागणी, वीजपुरवठा किती वेळा खंडित झाला, त्यामागील कारणे, तसेच वीज खंडित झाल्यानंतर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करण्यात आली याची सविस्तर माहिती घेतली. मुख्य अभियंता संजय पाटील हेही यावेळी उपस्थित होते. वीज समस्येवर उपलब्ध पर्यायांची माहिती घेतल्यानंतर, हे पर्याय माहिती असूनही त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा का करण्यात आला नाही, असा सवाल औंढेकर यांनी अभियंत्यांना केला. यापूर्वी कोणता पत्रव्यवहार झाला, कोणत्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले, याचीही माहिती मागविण्यात आली.

प्रश्नोत्तरांनंतर वारंवार वीज खंडित होऊ नये यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. उपकेंद्रातील रिकाम्या जागेवर अधिक क्षमतेचा रोहित्र बसवून त्यासाठी आवश्यक वीजवाहिनी व जोडण्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मे आणि जून महिन्यातील वीजखंडितीचाही आढावा घेण्यात आला.
पाऊस आणखी पंधरा दिवस लांबण्याची शक्यता असल्याने कामोठ्यातील वीज मागणी वाढतच राहणार आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस नागरिकांना ‘बत्तीगुल’चा सामना करावा लागू नये यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

सेक्टर ९ येथील उपकेंद्रात सध्या १० एमव्हीए क्षमतेचे तीन, म्हणजे एकूण ३० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र आहेत. त्यामध्ये वाढ करून आणखी ५ एमव्हीए क्षमतेचा रोहित्र तातडीने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा खर्च, जागेची पाहणी आणि आवश्यक साहित्याची जुळवाजुळव याच बैठकीत करण्यात आली. खांदेश्वर येथील महागृहनिर्माण प्रकल्पातील नव्या उपकेंद्रातून एक वीजजोडणी येथे उपलब्ध झाली आहे. सिडकोने अद्याप या प्रकल्पातील घरांचा ताबा दिलेला नसल्याने त्या इनकमरवरील वीजप्रवाहावर ५ एमव्हीएचा रोहित्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालकांना कळवलेच नाही…औंढेकर यांनी कामोठ्यातील अधिकाऱ्यांना फैलावर घेताना एक महत्त्वाची बाब समोर आली. त्यांचे वाहनचालक दररोज कामोठ्यात येत असल्याने वीजखंडितीनंतर संतप्त नागरिकांकडून उपकेंद्राबाहेर होत असलेला रोष त्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. शनिवारी घडलेला प्रकारही वाहनचालकाने औंढेकर यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र मुख्य अभियंत्यांपासून इतर कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्यांनी ही गंभीर परिस्थिती वरिष्ठांच्या कानावर घातली नसल्याने औंढेकर यांनी संताप व्यक्त केला. अखेर प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर औंढेकर स्वतः सोमवारी सकाळी कामोठे उपकेंद्रात दाखल झाले. अभियंत्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याची तयारी दर्शवत, मात्र वीजग्राहकांचा प्रश्न तातडीने सोडविण्यावर भर देण्याची भूमिका त्यांनी घेतली.