पनवेल : शाळेतून बसने घरी परतणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेचा बसचालकाने विनयभंग केल्याची घटना बुधवारी दुपारी कामोठे येथे घडली. या प्रकरणी बालिकेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कामोठे पोलिसांनी संबंधित बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील पीडित बालिका कुटुंबासह कामोठे सेक्टर १८ येथे राहते. बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ती सेक्टर ३६ येथील शाळेतून बसने घरी परतत होती. त्यावेळी बसचालकाने तिचा विनयभंग केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. घरी आल्यानंतर पालकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्री साडेदहा वाजता तातडीने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित चालक ३० वर्षांचा असून तो कळंबोली सेक्टर ३ येथील माऊली मंदिराजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६५(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ५(एम) आणि ६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे करीत आहेत. बालिकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
