पनवेल : कामोठे येथील दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या मैदानावर खो खो प्रशिक्षणादरम्यान विजेचा धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तब्बल पाच महिन्यांनंतर खो खो प्रशिक्षक आणि विद्यालयाच्या प्राचार्य यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी कामोठे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना ३० मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. दत्तूशेठ पाटील विद्यालयाचे मैदान शालेय वेळेव्यतिरिक्त खासगी खो खो प्रशिक्षणासाठी दोन तरुणांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. संकेत करे आणि त्याचा सहकारी या मैदानावर परिसरातील मुलांना खो खोचे प्रशिक्षण देत होते.

प्रशिक्षणादरम्यान मैदानावर हॅलोजन बल्ब लावण्याचे काम प्रशिक्षणार्थी मुलांकडून केले जात असताना ही घटना घडली. बल्ब लावण्यासाठी १४ वर्षीय मुलाच्या हातात विज वाहिनी देण्यात आली होती. त्याचवेळी दुसऱ्या मुलाने विजेचा प्रवाहाचे बटन सुरू केले. तारांमधून वीजवाहिनीतून वीजगळती झाल्याने १४ वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत विद्यार्थी हा या शाळेत शिकणारा नसून तो कामोठे उपनगरातील इतर शाळेत शिकत होता. 

या घटनेनंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मुलाच्या पालकांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आवश्यक पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलाला प्रशिक्षणासाठी पाठवले असताना त्या विद्यार्थ्यांकडून बल्ब लावणे आणि विजेच्या तारा हाताळण्याचे काम देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

या प्रकरणी खो खो प्रशिक्षक संकेत करे आणि विद्यालयाचे प्राचार्य यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याच्याकडून विजेच्या तारा हाताळण्याचे काम करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेला नेमका जबाबदार कोण, तसेच मैदानावरील विद्युत व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास कामोठे पोलीस करीत आहेत. 

नवी मुंबई, पनवेलमध्ये टर्फचा व्यवसाय तेजीत…

नवी मुंबई आणि पनवेलमधील अनेक शैक्षणिक संस्थांना (शाळांना) क्रीडांगणांसाठी अल्पदरात भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. शालेय वेळेव्यतिरिक्त परिसरातील मुलांना या मैदानांवर विनामुल्य खेळता यावे, यासाठी मैदाने खुली ठेवण्याची सूचना सिडको मंडळाने शाळा व्यवस्थापनांना केली आहे. मात्र, मैदानांची दुर्दशा होईल, असे कारण पुढे करून अनेक शाळा व्यवस्थापनांकडून मैदानांची प्रवेशद्वारे बंद ठेवली जातात. तर काही शैक्षणिक संस्था मैदानांचा मोठा भाग फुटबॉल टर्फ उभारण्यासाठी इतर संस्थांना भाड्याने देत असल्याचे समोर आले आहे. सिडको मंडळाने मागील काही महिन्यात अनेक शाळांवर दिखाव्यासाठी नोटीस बजावण्याची कार्यवाही केली.

शैक्षणिक संस्थांच्या मैदानांवर टर्फचा व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यवस्थापनांकडून गुंतवलेली रक्कम वसूल करण्यासाठी खेळाडूंकडून तासांनुसार शुल्क आकारले जाते. त्यामुळे मैदानांवर खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना मोठा खर्च करावा लागत आहे. शैक्षणिक संस्थांना अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या भूखंडांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याने या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पालकांडून व्यक्त होत आहे.

सिडकोच्या शहर व्यवस्थापक विभागाने शाळांना उपलब्ध करून दिलेल्या मैदानांचे सर्वेक्षण करावे. तसेच, किती शाळांना मैदानांवर टर्फ उभारण्याची आणि क्रीडांगणांचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे, याची माहिती तपासावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.