उरण : करंजा बंदरातून होणाऱ्या मासळी निर्यातीत वाढ झाली आहे. येथील व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये ३० ते ३५ हजार टन इतकी मासळी परदेशांमध्ये पाठवण्यात आली. विशेष म्हणजे राज्यातील एकूण निर्यातीच्या १० टक्के निर्यात येथून झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अनेक कारणांमुळे यंदा मासळीची आवक कमी होती, मात्र तरीही निर्यातीत वाढ झाल्याने निर्यातदारांना दिलासा मिळाला.

करंजा बंदर हे देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे केंद्र बनू पाहात आहे. येथे अरबी समुद्रातून पकडलेल्या रिबन फिश, कटल, माकोल, नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप, थायलंड, व्हिएतनाम, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमध्ये करण्यात येते. यंदाच्या हंगामात करंजा बंदरावर मोठ्या प्रमाणात मासळी उतरविण्यात आली. तसेच येथून होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याची माहिती करंजा येथील निर्यातदार गणेश नाखवा यांनी दिली.

कंरजा बंदर परिसरात विविध प्रकारच्या लघुउद्योगांत वाढ झाली आहे. त्यामुळे बंदरातील ४५० मासेमारी बोटी, त्यावर आधारित २ हजार कुटुंबाना याचा लाभ होत आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. येथे प्रामुख्याने कोळी-आगरी बांधवांचीच सर्वाधिक वस्ती असल्यामुळे या बंदराचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

राज्यातील सर्वाधिक सुमारे ४५० मच्छीमार बोटी याच करंजा गावात मासेमारी करतात. राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्थाही करंजातच आहे. वार्षिक सुमारे १०० कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून डिझेल पुरवठा केला जात आहे. मच्छीमारांसाठी लागणारे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी दुकानही येथे आहेत. याचा फायदा स्थानिक मच्छीमारांना होतो.

९० टक्के बोटी बंदरावर

मासेमारी हंगाम १ जूनपासून दोन महिन्यांसाठी बंद होणार आहे. सध्या ९० टक्के मासेमारी बोटींनी करंजा बंदरात नांगर टाकला असल्याची माहिती करंजा संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली. यावर्षी ऑगस्ट ते मे या मासेमारी हंगामादरम्यान आलेल्या अनेक संकटांत पापलेट आणि बांगडा या मासळीने मच्छीमारांना आधार दिल्याचे त्यांनी नमूद केले.