scorecardresearch

करंजा-रेवस ‘रो-रो’ सेवा रखडली ;रेवस बंदरात काम रखडल्याने २०२३ उजाडण्याची शक्यता

रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागमधील रेवस व उरणच्या करंजा बंदराच्या दरम्यान महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून रो-रो सेवेचे काम सुरू असून मे २०२२ पर्यंत मुदत असतानाही हे काम रखडले आहे.

उरण : रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागमधील रेवस व उरणच्या करंजा बंदराच्या दरम्यान महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून रो-रो सेवेचे काम सुरू असून मे २०२२ पर्यंत मुदत असतानाही हे काम रखडले आहे.
ही सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत वेळ लागण्याची शक्यता असल्याने नव्या वर्षांतच सेवेला सुरुवात होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
उरण ते अलिबाग हे रस्त्याने ६० किलोमीटर अंतर आहे. तर उरणमधील करंजा बंदर ते अलिबागच्या रेवस बंदरातून जलप्रवास केल्यास २० मिनिटात हे अंतर पार करता येते. राज्य सरकारने अलिबागच्या दळणवळणासाठी मुंबई व उरण या दोन भागांना जोडण्यासाठी गोवा राज्यात चालणाऱ्या चारचाकी वाहने वाहून नेणाऱ्या रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा ही रो रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून अवघ्या तासाभरात आपल्या वाहनास अलिबागमध्ये पोहचता येते. अशाच प्रकारची सेवा उरण ते अलिबागमधील रेवस ते करंजा दरम्यान करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने घेतला होता. यातील करंजा बंदराची जेट्टी तयार होऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र रेवस जेट्टीचे काम रखडल्याने ही सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.
६० टक्के काम पूर्ण
रेवस बंदरातील जेट्टीचे काम मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सध्या ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karanja rewas ro ro service stalled probability delay rewas port amy

ताज्या बातम्या