पनवेल – पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या वन्यजीव नोंदणी मोहिमेत यंदा एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे. अभयारण्यालगत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गवरील प्लास्टिक गतिरोधकांवरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या सततच्या आवाजाने वन्यजीवांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. १ मे रोजी झालेल्या या मोहिमेत वन्यजीवांची संख्या सव्वाशेवर पोहोचली असली, तरी या आवाजाचा वन्यजीवांवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरत आहे.

राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळख असलेल्या कर्नाळा अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ तासांच्या निरीक्षणातून वन्यजीवांची नोंद घेण्यात आली. जेष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांच्यासारख्या वनतज्ज्ञांच्या अभ्यासातून कर्नाळा पक्षी अभयारण्याची आणखी माहिती पक्षीप्रेमींना मिळू शकली. मागील वर्षी ८२ वन्यजीवांची नोंद बुद्धपोर्णिमेला झाली होती. यंदा ही संख्या वाढल्याने जैवविविधतेत सकारात्मक वाढ दिसून आली. मात्र, वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनात बदल होत असल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे.

अभयारण्यालगतच्या महामार्गावर बसवलेल्या प्लास्टिक गतिरोधकांमुळे वाहनांचे चाक आपटल्याने होणारा आवाज रात्रभर सुरू असतो. या आवाजामुळे वन्यजीवांच्या विश्रांतीत अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. आवाज रोधक यंत्रणा उभारण्यात आली असली, तरी तिचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

यंदाच्या नोंदणीत सस्तन प्राण्यांमध्ये रानडुक्कर, माकड, हनुमान लंगूर, खार, ड्रॅंगो, पाचू कवडा, वटवाघूळ, हरियाल, भारव्दाज (कुंभार कोकिळा), कोकिळा, पांढ-या छातिचा पाणकोंबडा, टिटवी, लाल चोचीचा सुरय, मोठा सुरय, छोटा पाणकावळा, काळ्या मुकुटाचा रात्रीचा बगळा, छोटे बगळे, डुडुळा – कंठेळी शिंगळा घुबड, जंगल घुबड, पांढ-या गळ्याचा खंड्या, तांबट पक्षी, कुटूरगा -तपकिरी डोक्याचे तांबट, सुतापरक्षी,  गुलाबी कंठ असलेला पोपट, नवरंग, हळद्या, बुरखाधारी हळद्या, कोतवाल, टकाचोर, शिंपी, लाल मिशा असलेला बुलबुल, लाल पोटाचा बुलबुल, फुगीर घसा असलेला बॅबलर, रान कस्तुर, दयाळ, शिळकरी कस्तूर – पर्वत कस्तूर, सोनकपाळी पर्णपक्षी – जांभळ्या कंठाचा बुलबुल, होला, रातवा, भृंगराज, मोर, निखर, बारबेट, सातभई, सुतार (तांबूस) अशा वन्यजिवांची नोंद झाल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एन. डी. राठोड यांनी लोकसत्ताला दिली.

राठोड यांनी दिलेल्या माहितीनूसार १ ते २ मे या दरम्यान कल्हे व आपटा या अभयारण्याच्या परिसरात तीन मचाण आणि चार ट्रॅप कॅमेरा यांच्या साह्याने सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सर्पमित्र, वन विभागाचे कर्मचारी असे १५ जणांच्या पथकाने ही नोंद केल्याची माहिती राठोड यांनी दिली. तसेच अभयारण्यातील पक्षांना महामार्गावरील वाहनांचा आवाज येऊन त्यांच्या रात्रझोपेत अडथळा होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पुरेशा उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही राठोड यांनी सांगीतले.  

मागील वर्षीच्या नोंदणीत रानडुक्कर आढळले नव्हते, मात्र यावेळी आढळले. ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. मात्र, पूर्वी अभयारण्यात सर्रास दिसणारा रानगवा यावेळी पाणथळ भागात दिसला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पक्षी निरीक्षक ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले की, “मागील वर्षी रात्री घुबडांचा आवाज अनेकदा ऐकू यायचा, मात्र यंदा तो फारसा ऐकू आला नाही. पहाटे एकदाच आवाज ऐकू आला. त्यामुळे घुबडांची संख्या कमी झाली असावी अशी शंका आहे. तसेच महामार्गावरील गतिरोधकांमुळे होणारा आवाज १५० मीटर अंतरावरही स्पष्ट ऐकू येत होता. त्यामुळे वन्यजीवांनी त्यांच्या अधिवासात बदल केला असावा.” असे त्या म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केवळ संख्या वाढणे पुरेसे नसून त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे शांत वातावरण टिकवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.