कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचे व्यवहार सुरूच

२२ वर्षांपूर्वी पनवेलच्या खेळाडूंसाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्यात आली.

ईडीमार्फत पत्र किंवा नोटीस न आल्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा खुलासा

पनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेकानंद पाटील यांची २३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. यात कर्नाळा क्रीडा अकादमीसह काही भूखंडांचाही समावेश आहे. असे असताना बुधवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचे व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते. ईडीमार्फत पत्र किंवा नोटीस न आल्याचा खुलासा अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच शेकापच्या अनेक नेत्यांनीही या कारवाईबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये ५६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेकानंद पाटील यांना १५ जूनला ईडीने अटक केली होती. मंगळवारी ईडीने विवेकानंद पाटील यांची २३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेमध्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि काही भूखंडांचा समावेश आहे.

२२ वर्षांपूर्वी पनवेलच्या खेळाडूंसाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्यात आली. जप्तीच्या कारवाईची बातमी बुधवारी येताच खेळाडूंनी अकादमीशी संपर्क साधत माहिती घेतली. मात्र अकादमीला ईडीमार्फत कोणतेही पत्र किंवा नोटीस आली नसल्याचे अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पाठक यांनी सांगितले.

या अकादामीत दीडशेहून अधिक खेळाडूंनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हे खेळाडू कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. तर तेथील अनेक गाळे भाडय़ाने देण्यात आले असून व्यावसायिकही चिंताग्रस्त आहेत. याच अकादमीमध्ये बांझ हायस्कूल व महाविद्यालय चालविले जाते. या शैक्षणिक संस्थेत शिकणारे १२०० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खेळाडूंच्या भवितव्यासाठी इतर अकादमीत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आता होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnala sports academy continue its operations navi mumbai ssh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या