नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील सिडकोच्या भूखंडांना मोठी मागणी आहे. नुकत्याच धालेल्या ई-लिलावात खारघर सेक्टर १५ मधील ३,९९९.६२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला तब्बल ७ लाख ७ हजार रुपये प्रतिचौरस मीटर असा विक्रमी दर मिळाला. या एकाच भूखंडाच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत सुमारे २८२ कोटी ७७ लाख रुपये जमा होणार आहेत. खारघरमधील सिडकोच्या भूखंडाला आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याची चर्चा आहे.
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नवी मुंबईतील विविध नोडमधील निवासी, वाणिज्यिक तसेच अन्य वापराचे भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी काढले होते. खारघर सेक्टर १५ मधील भूखंडासाठी ड्रीम अभिनंदन इन्फ्रा (ड्रीम डेव्हलपर्स) यांनी सर्वाधिक बोली लावली. प्रतिचौरस मीटरच्या दराने सात लाखांचा टप्पा ओलांडल्याने खारघरमधील जमिनीच्या वाढत्या किमती पुन्हा अधोरेखित झाल्या.
खारघर सेक्टर ५ ए मधील एका मोठ्या भूखंडालाही सुमारे साडेतीन लाख रुपये प्रतिचौरस मीटरचा दर मिळाला असून, या व्यवहारातून सिडकोला सुमारे ५१४ कोटी रुपये मिळणार आहेत. याच परिसरातील आणखी एका भूखंडाच्या विक्रीतून सुमारे ३६९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
कामोठे सेक्टर ५२ मधील एका भूखंडाला २ लाख ३५ हजार रुपये प्रतिचौरस मिटरचा दर मिळाला असून, त्यातून सुमारे ३६० कोटी रुपये, तर दुसऱ्या भूखंडातून २६८ कोटी रुपये सिडकोला मिळणार आहेत. द्रोणागिरी सेक्टर ४७ मधील भूखंडाला १ लाख ९१ हजार ७०० रुपये प्रतिचौरस मीटरचा दर मिळाला असून, त्यातून सुमारे १८४ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, खारघर तूर्भे टनेल आणि परिसरातील वाहतूक प्रकल्पांमुळे खारघर, कामोठे आणि द्रोणागिरी परिसरातील भूखंडांना विकासकांकडून वाढती मागणी आहे. खारघरमध्ये प्रतिचौरस मीटरचा दर सात लाखांवर गेल्यामुळे आगामी सिडको भूखंड लिलावांकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. सिडकोने खारघर-तुर्भे बोगदा प्रकल्पाचे कामही हाती घेतले आहे. याशिवाय विविध दळणवळण आणि गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागल्यामुळे या सर्व विकासकामांचा सकारात्मक परिणाम बांधकाम क्षेत्रावर होत असल्याचे दिसून येत आहे. सिडकोने नुकत्याच केलेल्या भूखंडांच्या ई-लिलावात मिळालेल्या दरांवरही या विकासकामांचा प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. – प्रिया रातांबे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, सिडको
