पनवेल – खारघर उपनगरातील सेक्टर ५ मधील अंबामाता मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा सुमारे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे घराबाहेर जात असल्याचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र पनवेल परिसरात दिसत आहे. अशाच प्रकारे खारघरमधील अंबामाता मंदिरावर चोरट्याने डोळा ठेवत रविवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास मंदिरात प्रवेश केला.मंदिर प्रशासनाने खारघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित चोरटा ट्रॅकशर्ट व पॅन्ट घालून मंदिराच्या कुंपणावरून आत शिरला. त्याने प्रथम मंदिरातील पुजाऱ्यांच्या राहत्या खोलीचे दार बाहेरून कपड्याने बांधून त्यांना अडवले. त्यानंतर गाभाऱ्याच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश करत चोरी केली.

चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम तसेच देवीचे चांदीचे दागिने (हार, कानातील झुमके आणि मांगटिका) असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एकूण चोरीचा मुद्देमाल सुमारे ४४ हजार रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.