पनवेल – पनवेल महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघी एक रात्रच शिल्लक असताना बुधवारी सायंकाळी खारघर येथील सेक्टर २० मधील यश एव्हेन्यू या निवासी इमारतीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आणलेली सव्वा दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मतदानाच्या स्लिपा वाटपासाठी परवानगी घेऊन आलेल्या व्यक्तींकडे रोख रकमेची बॅग असल्याचा संशय नागरिकांना आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तींनी बॅग इमारतीतच टाकून पलायन केले, तर निवडणूक विभागाने पंचनामा करून रोकड जप्त केली.
खारघर परिसरात घरोघरी जाऊन रोख रकमेची पाकिटे वाटली जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, बुधवारी सायंकाळी यश एव्हेन्यू इमारतीत आलेल्या एका दुकलीने स्लिप वाटपाच्या नावाखाली काही घरांत पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. प्रामाणिक मतदारांनी तात्काळ याला विरोध करत जवळच्या शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)च्या उमेदवारांना माहिती दिली. काही वेळातच शेकापचे कार्यकर्ते आणि प्रभागातील उमेदवार जगदीश घरत घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, रोकड वाटपासाठी आलेल्या तरुणांनी विरोध करणाऱ्या महिलेला लाथ मारून २ लाख १३ हजार रुपयांची बॅग इमारतीत फेकली आणि तेथून पसार झाले. या घटनेनंतर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्याची मागणी केली. सायंकाळी सुमारे सात वाजता खारघर पोलिसांच्या उपस्थितीत रोकड जप्तीचा पंचनामा करण्यात आला.
बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम, मतदारांच्या याद्या, निवडणूक स्लिपा तसेच भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांचे फोटो आढळल्याची माहिती देण्यात आली. दोन बॅगा आणल्याचा संशय असून एक बॅग अद्याप न सापडल्याचा दावा शेकापकडून करण्यात आला आहे.या प्रकारामुळे खारघरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, लोकशाही प्रक्रियेत पैशाच्या जोरावर हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यात आला आहे. निवडणूक विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

