पनवेल – शीव–पनवेल महामार्गावरील खारघर उड्डाणपुलावर पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार डागडुजी करूनही समस्या कायम असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वर्दळीच्या वेळेत खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होत असून महामार्गावर कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.

खारघर उड्डाणपुलावरील काही ठिकाणी सुमारे अर्धा फूट खोल खड्डे पडले असून पुलावरील दोन्ही बाजूला उंचसखल भागामुळे वाहनांची चाके जोरात आदळत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांचा तोल जाण्याच्या घटना वारंवार घडत असून किरकोळ अपघातांची संख्याही वाढली आहे. चारचाकी वाहनचालक खड्डे टाळण्यासाठी किंवा मोटारींना धक्का कमी बसावा म्हणून अचानक वेग कमी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची एकमेकांना धडक होण्याच्या घटना घडत असून मोठ्या अपघातांचे सत्र सुरू आहे.

गंभीर अपघात झाल्यावरच पुलातील हा दोष दूर करणार का अशी भीती डॉ. सूनील शिरीषकर यंनी व्यक्त केली आहे. शीव–पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण झाल्यानंतर २२ किलोमीटरचे अंतर २५ मिनिटांत पार करता येईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. मात्र सध्या त्याच महामार्गावरील बांधलेल्या पुलांच्या बांधकामातील दोष समोर येत असून खड्ड्यांची समस्या गंभीर बनली आहे. उड्डाणपुलावरच खड्डे पडल्याने मोठा अपघात झाल्यास मदतकार्य तातडीने कसे पोहोचवायचे, असा प्रश्न वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांसमोर उभा राहत आहे.

खारघर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी या समस्येबाबत एमएसआरडीसीला वेळोवेळी लेखी पत्र पाठवून खड्डे तातडीने भरण्याची तसेच उड्डाणपुलावरील उंचसखल भागाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. कंत्राटदारामार्फत यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली असली तरी काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे केवळ तात्पुरती डागडुजी न करता टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे . ‘अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमएसआरडीसी विभागाकडे महामार्गावरील खारघर उड्डाणपुलावरील खड्डे भरण तातडीने करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रात्रीच या खड्यात मेस्टीक टाकून खड्डे भरून घेणार असल्याचे संबंधित अधिका-यांनी कळवले आहे’ – जी. एम. मुजावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक शाखा